Rain Update: बाप्पा पावणार; वरूणराजा बरसणार, येत्या २ दिवसात राज्यात जाेरदार पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 14:14 IST2023-09-20T12:47:41+5:302023-09-20T14:14:08+5:30
गेल्या काही दिवसांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कडक ऊन पडत असल्याने जणूकाही ऊन-पावसाचा लपंडावच सुरू असल्याचा अनुभव

Rain Update: बाप्पा पावणार; वरूणराजा बरसणार, येत्या २ दिवसात राज्यात जाेरदार पावसाची शक्यता
पुणे : गणरायाच्या आगमनाला जोरदार पाऊस होईल, असा अंदाज होता. परंतु, काही भागात हलक्या सरी कोसळल्या. जोरदार पाऊस मात्र झाला नाही. पण, येत्या दोन दिवसांत पुण्यासह राज्यात जाेरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. बाप्पाच्या आगमनामुळे तरी वरूणराजा प्रसन्न होईल आणि जोरदार पाऊस येईल, अशी अपेक्षा पुणेकरांची आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चांगल्या पावसाची आशा पल्लवीत झाल्या आहेत. २१ सप्टेंबरपासून पुण्यासह घाटमाथ्यावर आणि महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. त्यानंतर लगेच कडक ऊन पडत असल्याने जणूकाही ऊन-पावसाचा लपंडावच सुरू असल्याचा अनुभव पुणेकरांना येत आहे. येत्या आठवडाभर पुण्यात आकाश ढगाळ राहणार असून, सायंकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुण्यात आतापर्यंत सरासरी ५३८.९ पावसाची नोंद होत असते. परंतु, यंदा केवळ ३३४ मिमी. पाऊस झाला आहे. त्यामुळे किमान आता बाप्पाच्या आगमनामुळे तरी वरूणराजा पुणेकरांना पावेल, अशी आशा आहे.