गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: १० वर्षापूर्वीच्या भांडणाचा बदला, मोहोळ टोळीत माणूस पेरून केला गेम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 11:40 AM2024-01-06T11:40:30+5:302024-01-06T11:46:18+5:30

दहा वर्षांपूर्वी शरद मोहोळ आणि यातील काही आरोपींचे भांडण झाले होते...

Gangster Sharad Mohol murder case: 10-year-old feud determined to be the cause of death, Mohol gang played a game by planting a man | गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: १० वर्षापूर्वीच्या भांडणाचा बदला, मोहोळ टोळीत माणूस पेरून केला गेम

गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: १० वर्षापूर्वीच्या भांडणाचा बदला, मोहोळ टोळीत माणूस पेरून केला गेम

- किरण शिंदे

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा शुक्रवारी भरदिवसा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या खुनाचा कट महिनाभरापासून शिजत होता. विशेष म्हणजे शरद मोहोळच्या जवळचीच माणसे हा कट रचत होते. याचा शरद मोहोळला जरा सुद्धा सुगावा लागला नाही. शरद मोहोळची हत्या करण्यामागचे कारणही समोर आले आहे. दहा वर्षांपूर्वी झालेले भांडण या खुनाचे कारण ठरले आहे. या खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. यातील मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा वीस वर्षाचा तरुण प्रमुख मारेकरी आहे. 

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी शरद मोहोळ आणि यातील काही आरोपींचे भांडण झाले होते. त्यावेळी आरोपी लहान होते. तेव्हा शरद मोहोळने त्यांना मारहाण केली होती. शरद मोहोळ आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यासाठी असल्याने त्यांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, चारचौघात अपमान करणे अशी कृत्य शरद मोहोळकडून वारंवार होत होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी फार पूर्वीच बदला घेण्याचे ठरवले होते. 

महिनाभरापूर्वीच आरोपींनी शरद मोहोळचा खून करण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी तीन पिस्टल खरेदी केल्या. शरद मोहोळच्या संपूर्ण दिनक्रमाची आरोपींनी रेकी केली. त्याच्या येण्या जाण्याच्या वेळा, कुठे जातो कुणाला भेटतो याची इत्यंभूत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. आरोपींनी मारेकरी मुन्ना पोळेकरला आधीच शरद मोहोळच्या टोळीत घुसवले. मुन्ना पोळेकर हा सतत शरद मोहोळच्या सोबत असायचा. त्यामुळे शरद मोहोळची दिवसभरातील संपूर्ण माहिती तो आरोपींना देत होता. 

त्यानंतर शुक्रवारचा दिवस उजाडला. त्यादिवशी शरद मोहोळचा खून करण्याचे आरोपींनी ठरवले. मुन्ना पोळेकर त्यादिवशीही शरद मोहोळ सोबत होताच. दुपारी एक वाजून वीस मिनिटाच्या सुमारास शरद मोहोळ सुतारदरा येथील घरातून बाहेर पडला. लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होता. हीच संधी आरोपींनी साधली. दबा धरून बसलेल्या आपल्या इतर साथीदारांना मुन्ना पोळेकर याने खबर दिली. आणि त्यानंतर घरातून बाहेर पडताच सर्वात आधी मुन्ना पोळेकर यानेच शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात शरद मोहोळ खाली कोसळला. मोहोळ सोबत असणाऱ्या इतरांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याजवळ बंदूक असल्याने ते घाबरून पळून गेले. त्यानंतर आरोपींनी दोन चार चाकी गाड्यातून पळ काढला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मात्र अवघ्या काही तासात या सर्व आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

खून केल्यानंतर खरंतर आरोपींनी पळ काढला होता. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने, सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली. त्यांच्या गाडीचा क्रमांक मिळवला. पुणे शहराच्या बाहेर जाणाऱ्या सर्व मार्गावर या गाड्यांचा शोध घेण्यात आला. दरम्यान हे सर्व आरोपी शिरवळच्या दिशेने निघाले असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आनेवाडी, शिरवळ आणि वाई, पाचगणी परिसरात नाकाबंदी सुरू केली. यासाठी सातारा पोलिसांची ही मदत घेण्यात आली. मात्र तासाभराहून अधिक वेळ गेला तरी आरोपींची गाडी या ठिकाणाहून क्रॉस होत नव्हती. त्यामुळे आरोपी मध्येच कुठेतरी थांबले असावेत असा कयास धरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खेड शिवापुर परिसरात सर्च मोहीम सुरू केली. यादरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांना खेडशिवापूर परिसरातच रस्त्याच्या कडेला एके ठिकाणी आरोपींची गाडी दिसली. त्यानंतर पोलिसांनी या गाडीला गराडा घालून आरोपींना अटक केली. 

वकिलाचाही सहभाग...

दरम्यान शरद मोहोळ खून प्रकरणात एका वकिलाचाही सहभाग असल्याचे आता समोर आले आहे. हा वकीलच आरोपींना मार्गदर्शन करत होता अशीही माहिती समोर आली आहे. या वकिलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला अटक करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Gangster Sharad Mohol murder case: 10-year-old feud determined to be the cause of death, Mohol gang played a game by planting a man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.