Pune: मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; ४ पिस्टल, ८ काडतुसांसह कोयता जप्त
By नितीश गोवंडे | Updated: April 3, 2024 17:43 IST2024-04-03T17:43:13+5:302024-04-03T17:43:50+5:30
ही कारवाई सोमवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास धायरी परिसरातील डिएसके स्कुल कडे जाणाऱ्या रोडवरील पार्किंग मध्ये करण्यात आली....

Pune: मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक; ४ पिस्टल, ८ काडतुसांसह कोयता जप्त
पुणे : मॉलमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना ताब्यात घेऊन सिंहगड रोड पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक करुन तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४ पिस्टल, ८ काडतुसे आणि कोयता असा १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास धायरी परिसरातील डिएसके स्कुल कडे जाणाऱ्या रोडवरील पार्किंग मध्ये करण्यात आली.
वैभव राऊत (रा. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सुरेंद्र दिलीप जगदाळे यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी धायरी येथील डीएसके स्कुलकडे जाणाऱ्या रोडलगत असलेल्या पार्किंगमध्ये काही तरुण अंधारात थांबले आहेत. त्यांच्याकडे पिस्टल व कोयता असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा रचला.
पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह चौघांना ताब्यात घेतले. तर त्यांचे इतर तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे हत्यारे आढळून आली. पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता स्मार्ट पॉईंट मॉल येथे दरोडा टाकणार असल्याची कबुली त्यांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.