पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात २१ आरोपींविरोधात १७०० पानांचे आरोपपत्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सादर केले असून, आरोपींविरोधात विशेष न्यायालयात आरोप निश्चितीला सुरुवात झाली आहे. वनराज आंदेकरचा खून कौटुंबिक संपत्तीवरून भांडणे, टोळीयुद्ध आणि आर्थिक वर्चस्ववादातूनच झाल्याचा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे बुधवारी पुण्याच्या विशेष न्यायालयात केला. मात्र, या प्रकरणाचे तपास अधिकारी व बचाव पक्षाचे वकील उपस्थित नसल्याने पुढील तारखेलाही आरोपनिश्चितीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतर खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ होणार आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणात त्याची बहीण संजीवनी, जावई जयंत, गणेश व प्रकाश कोमकर आणि टोळीप्रमुख सोम्या ऊर्फ सोमनाथ गायकवाडसह २१ आरोपींविरोधात विशेष न्यायालयात आरोपनिश्चितीच्या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी गुन्ह्याचे स्वरूप, आरोपींविरोधातील आरोप आणि पुराव्यांची मांडणी केली. घटनेचे आणि आरोपी फरार असतानाचे सीसीटीव्ही चित्रीकरण आणि चित्रफिती, घटनास्थळाचा पंचनामा, ३९ साक्षीदारांचे जबाब, आरोपींचे मोबाइल कॉल डिटेल्स अहवाल, त्यांच्या आवाजाचे नमुने तपासणी अहवाल, वैद्यकीय अहवाल, आदी भक्कम पुरावे त्यांनी सादर केले.
आरोपी सोमनाथ गायकवाडच्या टोळीचा सदस्य निखिल आखाडेचा ऑक्टोबर २०२३मध्ये खून झाला होता. या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) अटक झालेले आरोपी बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर, कृष्णा आंदेकरसह अन्य आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. वनराज आंदेकर नगरसेवक असल्यानेच आरोपींना जामीन मंजूर झाल्याचा राग सोमनाथ गायकवाडला होता. वनराज आणि त्याची बहीण संजीवनी व जावई कोमकरांमध्ये कौटुंबिक संपत्तीवरून भांडणे होती. पुणे महापालिकेने आरोपी संजीवनी कोमकर हिच्या नाना पेठेतील जनरल स्टोअर्सवर अतिक्रमणविरोधी कारवाई केली होती. वनराजच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याच्या संशयातून आरोपी संतापले होते. त्यातून गायकवाड आणि कोमकर एकत्र आले. त्यांनी वनराजचा खून करण्याचा कट रचला. त्याच्यावर पाळत ठेवून दोन वेळा खून करण्याचा प्रयत्नही केला. प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी नाना पेठेतील वीज बंद करून आरोपींनी वनराजवर पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केला. पुणे पोलिसांनी या गुन्ह्याचा सविस्तर तपास करून पुरावे संकलित केले आहेत. त्यामुळे आरोपींविरोधात आरोप निश्चित करावेत, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केला.
Web Summary : Ex-corporator Andekar's murder was due to family disputes, gang war, and financial dominance. Gaikwad and Komkar plotted the murder, stemming from property disputes and resentment over encroachment actions. The court is reviewing evidence including CCTV, witness statements, and forensic reports.
Web Summary : पूर्व नगरसेवक आंदेकर की हत्या पारिवारिक विवादों, गिरोह युद्ध और वित्तीय वर्चस्व के कारण हुई। गायकवाड़ और कोमकर ने संपत्ति विवादों और अतिक्रमण कार्रवाई पर नाराजगी के चलते हत्या की साजिश रची। अदालत सीसीटीवी, गवाहों के बयान और फोरेंसिक रिपोर्ट सहित सबूतों की समीक्षा कर रही है।