'भावी खासदार सुनेत्रा पवार...! बारामतीत फ्लेक्सवर शाई फेकण्याचा खळबळजनक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 16:15 IST2024-02-11T16:14:50+5:302024-02-11T16:15:47+5:30
''भावी खासदार सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी प्रचंड मतांनी विजयी करा'' या आशयाचा फ्लेक्स त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आला होता

'भावी खासदार सुनेत्रा पवार...! बारामतीत फ्लेक्सवर शाई फेकण्याचा खळबळजनक प्रकार
सुपे (बारामती) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार म्हणुन लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर शाई फेकण्याचा प्रकार अज्ञात व्यक्तीने केला असल्याची घटना बारामती तालुक्यातील काऱ्हाटीपाटी नजीक रविवारी ( दि. ११ ) घडली. दरम्यान शाई फेकल्याचे लक्षात येताच पोलिसांच्यावतीने फ्लेक्स उतरवण्यात आला आहे.
काऱ्हाटी पाटी येथे एका शेती फार्म मालकाने सुनेत्रा पवार यांचा फलक उभा केला होता. या फलकावर भावी खासदार असा उल्लेख केलेला होता. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन फलकावर शाई फेकल्याचे आज ( रविवारी ) सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंगळवारी ( दि. ६ ) संध्याकाळी निवडणुक आयोगाने दिले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेला आपला उमेदवार उभा करणार असल्याचे सातत्याने भाषणातुन जाहिर करीत आहेत. पवार यांनी उमेदवाराचे नाव जाहीर केले नसले तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लोकसभेसाठी उमेदवार असणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे काऱ्हाटी पाटी येथे तो संबंधित फ्लेक्स लावण्यात आला होता. त्या फ्लेक्सवर सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी प्रचंड मतांनी विजयी करा. या आशयाचा फ्लेक्स त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांचा फोटो आहे. मात्र या फ्लेक्सवर अज्ञातांनी शाई फेक केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान सुपे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक नागनाथ पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी जावुन फ्लेक्स उतरवला आणि ताब्यात घेतला आहे. यावेळी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल गेला असुन अधिक तपास सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले.