फुरसुंगी : फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाला ३२ पैकी १९ जागेवर मोठे यश मिळाले असून राष्ट्रवादीचे संतोष सरोदे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाला ८, भारतीय जनता पार्टीला ५ जागेवर समाधान मानावे लागले. मतमोजणीच्या आठ फेऱ्या झाल्या. नगरपरिषद झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीसाठी उमेदवाराला दोन टप्प्यात दोन वेळा खर्च करावा लागला. निवडणूक काही उमेदवार इच्छुक न्यायालयात गेल्याने पुढे ढकलण्यात आली होती.
नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी १२० उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाने सर्व जागा लढविल्या. १६ वाॅर्ड होते, तर नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जातीसाठी जागा राखीव होती. शिवसेना व भाजपची युती होती तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली तर काँग्रेस, आप व बहुजन विकास आघाडी या तिघांनी एक एक जागा लढवली होती.
मतमोजणीला सकाळी दहाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदेची निवडणूक अतिशय चुरशीची धक्कादायक निकालाची झाली. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे, तर काहीजण अल्पमतांनी निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष सरोदे हे विजयी झाले आहेत. संतोष सरोदे यांना २० हजार ९०८ मते मिळाली, तर शिंदेसेनेचे महेंद्र सरोदे यांनी १८०१० मते मिळवत कडवी झुंज दिली. तसेच उबाठा सेनेचे सनी कांबळे यांना ६०५५ मते मिळाली.