Maharashtra Winter Update: सकाळी गारवा, दुपारी चटका! पुढील काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता
By श्रीकिशन काळे | Updated: February 11, 2025 19:46 IST2025-02-11T19:45:43+5:302025-02-11T19:46:37+5:30
राज्यामधील अनेक भागामध्ये पुढील तीन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे

Maharashtra Winter Update: सकाळी गारवा, दुपारी चटका! पुढील काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता
पुणे : सध्या फेब्रुवारी महिना अर्धा होत आला तरी देखील थंडीने मुक्काम हलवलेला नाही. सकाळी आणि रात्री थंडी, तर दुपारी उकाडा जाणवत आहे. या आठवड्यात किमान तापमानात दोन ते तीन अंशाची घट होणार आहे. त्यामुळे थंडीत काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.
राज्यामधील अनेक भागामध्ये पुढील तीन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुंबई शहर, ठाणे, जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक जिल्हा, नगर जिल्ह्यातील अकोला, संगमनेर, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर तालुका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड, सोयगाव तालुक्यांचा समावेश आहे. ११ ते १३ फेब्रुवारी आणि १७ व १८ फेब्रुवारी दरम्यान थंडीची शक्यता आहे. बदलत्या वाऱ्यांच्या पॅटर्ननुसार उत्तरेतील थंड वारे, उत्तर व उत्तर-वायव्य महाराष्ट्रापर्यंतच पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहाटे ५ वाजेचे किमान तापमान घसरून या भागात थंडी जाणवेल, असा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांमध्ये वातावरणात काही बदल जाणवणार नाही.
आतापर्यंतच्या दोन आठवड्याच्या काळात वारंवार दिशा बदलणाऱ्या, पण कमकुवत वाऱ्यांचे अस्थिर वहन महाराष्ट्रावर टिकून आहे. तसेच अधून-मधून महाराष्ट्रावर हवेच्या उच्च दाबातून, प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे उत्तरेतील थंड वाऱ्यांना भिंतीसारखा अटकाव केला गेला. जोपर्यंत सध्याचा महाराष्ट्रावरील वारा-वहनाचा पॅटर्न बदलत नाही व थंडीपूरक उत्तरेकडून वारा वहन होत नाही, तोपर्यंत थंडीची शक्यता जाणवणार नाही, असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला.
राज्यातील किमान तापमान
पुणे : १५.८
नगर : १६.५
जळगाव : १५.४
महाबळेश्वर : १७.०
नाशिक : १४.४
सोलापूर : २१.०
मुंबई : २१.५
अकोला : १९.७
नागपूर : १९.४
यवतमाळ : १७.०