शालेय मित्रानेच केला घात; कापड व्यवसायासाठी दिलेल्या १० लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 20:13 IST2021-02-27T20:12:46+5:302021-02-27T20:13:24+5:30
गेल्या २० वर्षापासून अगदी शाळेपासून मैत्री असलेल्या मित्राला कापड व्यवसाय करण्यासाठी त्याने १० लाख रुपये दिले.

शालेय मित्रानेच केला घात; कापड व्यवसायासाठी दिलेल्या १० लाखांची फसवणूक
पुणे : गेल्या २० वर्षापासून अगदी शाळेपासून मैत्री असलेल्या मित्राला कापड व्यवसाय करण्यासाठी त्याने १० लाख रुपये दिले. पण वर्षाची मुदत उलटून गेल्यानंतरही पैसे परत केले नाही. उलट पैसे मागितले तर परत न करता धमकी देऊन फसवणूक केली.
याप्रकरणी अमित कांबळे (वय ३९, रा. नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन रामचंद्र मारुती नाईक (रा. बर्गे मळा, इचलकरंजी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कांबळे आणि नाईक हे गेले २० वर्षापासून एकमेकांना ओळख असून शाळेपासून त्यांची मैत्री आहे. नाईक याला कापड व्यवसाय सुरु करायचा होता. त्यासाठी त्याने २०१६ मध्ये १० लाख रुपयांची कांबळेकडे मागणी केली होती. ते पैसे एक वर्षाच्या मुदतीत परत करण्याचे आश्वासन नाईक याने दिले होते. त्यानुसार कांबळे यांनी त्याला १० लाख रुपये दिले होते. वर्षभराची मुदत संपल्यानंतर कांबळे यांनी नाईककडे पैशाची मागणी केल्यावर त्याने लवकरात लवकर देतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने पैसे देण्याची टाळाटाळ करणे सुरु केले. वारंवार मागणी केल्यावर तो शिवीगाळ करु लागला. त्याने कांबळे यांना धमकी दिली. शेवटी कांबळे यांनी पैशाचा अपहार केल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली आहे.