बांधकामामध्ये गुंतवणुक करण्याच्या आमिषाने ७४ लाखांची फसवणूक;कोंढव्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 16:38 IST2021-03-10T16:37:28+5:302021-03-10T16:38:21+5:30
तुझे पैसे देत नाही, जा काय करायचे ते कर, मला त्रास दिला तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली.

बांधकामामध्ये गुंतवणुक करण्याच्या आमिषाने ७४ लाखांची फसवणूक;कोंढव्यात गुन्हा दाखल
पुणे : बांधकामामध्ये गुंतवणूक करण्याच्या बदल्यात इमारतीमधील १० फ्लॅट अथवा चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सचिन सोमनाथ जांभुळकर (वय ४२, रा. जांभुळकरमळा, भैरोबानाला) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रफीक मेहंमद शेख (रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०११ पासून सुरु होता.
याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सचिन जांभुळकर यांना रफीक शेख यांनी कोंढवा येथील ताहीर हाईटस या इमारतीच्या बांधकामामध्ये गुंतवणुक करण्यास सांगितले. त्या बदल्यात या इमारतीमध्ये १० फ्लॅट किंवा गुंतवणूक केलेल्या रकमेच्या योग्य मोबदला ६ महिन्याच्या आत देतो, असे सांगितले. त्यानुसार शेख यांनी जांभुळकर यांच्याकडून वेळोवेळी चेक व रोख स्वरुपात ७४ लाख १७ हजार रुपये घेतले. मात्र, इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता त्यांना फ्लॅट दिले नाही किंवा गुंतवणुक केलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. याबाबत त्यांनी विचारणा केल्यावर शेख यांनी जांभुळकर यांना धमकी देऊन तुझे पैसे देत नाही, जा काय करायचे ते कर, मला त्रास दिला तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर अधिक तपास करत आहेत.