शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:07 IST2025-06-15T12:07:00+5:302025-06-15T12:07:26+5:30
सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी सहा लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक दत्तवाडी भागात राहायला आहेत.
सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. चोरट्यांनी गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांना पैसे जमा करण्यास सांगितले. सुरुवातीला चाेरट्यांनी त्यांना परताव्यापोटी काही रक्कम दिली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतवण्यास सांगितले. रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना परतावा, तसेच मूळ मुद्दल देण्यात आली नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.