पुणे: कात्रज घाटात रंगकाम करणाऱ्या ठेकेदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. ठेकेदाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एका बांधकाम व्यावसायिकाविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चंदर पिराजी माेहिते (५६, रा. विनय सागर आर्केड, त्रिमूर्ती चौकाजवळ, भारती विद्यापीठ परिसर) असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत मोहिते यांची पत्नी शकुंतला (५६) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिक संतोष चोरगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदर मोहिते हे गृहप्रकल्पातील रंगकामाचा ठेका घेतात. आरोपी बांधकाम व्यावसायिक चोरगे हे मोहिते यांच्या ओळखीचे होते. चोरगे यांनी त्यांना तीन गृह प्रकल्पांमध्ये रंगकाम करण्याचे काम दिले हाेते. या कामाच्या बदल्यात चोरगे यांनी माेहिते यांना एक सदनिका आणि साडेदहा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. मोहिते यांनी परिचितांकडून हातऊसने पैसे घेऊन तीन गृहप्रकल्पाचे रंगकाम पूर्ण केले होते. व्यवहारात ठरल्यानुसार चोरगे यांनी मोहिते यांना पैसे, तसेच सदनिका देण्याचे मान्य केले होते. मोहिते यांनी रंगकामाचे पैसे मागितले. तेव्हा चोरगे यांनी माेहिते यांना जातीवाचक शिवीगाळ केली. शिवीगाळ,तसेच फसवणूक केल्याने मोहिते यांनी ९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री कात्रज घाटातील अन्विषा लाॅजमागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, असे मोहिते यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक आवारे पुढील तपास करत आहेत.