चारशे फूट सिंहगडच्या दरीत पडले; रोपवेच्या साहाय्याने वर आणले, डॉक्टर किरकोळ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:44 IST2026-03-21T13:43:36+5:302026-03-21T13:44:45+5:30
कात्रजकडून येताना चिलीम खड्डा पॉइंटजवळ अरुंद पायवाटेवर पाय घसरल्याने डॉ. नंदवते चारशे फूट दरीत पडले

चारशे फूट सिंहगडच्या दरीत पडले; रोपवेच्या साहाय्याने वर आणले, डॉक्टर किरकोळ जखमी
खडकवासला : कात्रज ते सिंहगड पायवाटेवर ट्रेकिंग करत असताना चिलीम खड्डा पॉइंटवर एक तरुण पाय घसरून चारशे फूट दरीत कोसळला. गुरुवारी (दि.१९) सायंकाळी चारच्या समोर अशी घटना घडली. हवेली तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने अंधारात बॅटरीच्या उजेडात त्याला रोपच्या साहाय्याने दरीतून वर आणले. तो किरकोळ जखमी झाला.
मित्रांसमवेत डॉ. प्रशांत नंदवते (वय ४०, रा. मधुबन सोसायटी, कोल्हेवाडी, खडकवासला) कात्रज ते सिंहगड ट्रेकिंग करण्यासाठी गेले होते. कात्रजकडून येताना चिलीम खड्डा पॉइंटजवळ अरुंद पायवाटेवर पाय घसरल्याने डॉ. नंदवते चारशे फूट दरीत पडले. किरकोळ जखमी झालेल्या डॉक्टरांनी तातडीच्या मदतीसाठी ११२ क्रमांकावर कॉल केला. घटनेची माहिती मिळतात हवेली पोलीस ठाण्याचे हवालदार समाधान चोरमले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून अंधार पडल्याने हवालदार चोरमले यांनी हवेलीच्या आपत्ती व्यवस्थापन समतीतील तानाजी भोसले यांना सांगितले. भोसले समितीतील गणेश सपकाळ, वैभव भोसले, संतोष जाधव यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे कर्मचारी मदतीसाठी आले होते. अंधारात रोप लावून बॅटरीच्या उजेडात डॉ. नंदवते यांना रोपच्या साहाय्याने वर आणले. किरकोळ जखमी झाल्याने डॉ. नंदवते यांना प्राथमिक उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.