मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना जनरलचे चार डब
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:20 IST2025-01-06T18:19:47+5:302025-01-06T18:20:47+5:30
-ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना मिळणार जागा

मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना जनरलचे चार डब
- अंबादास गवंडी
पुणे : रेल्वे बोर्डाच्या नव्या नियमानुसार मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना चार जनरल डबे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे रेल्वे विभागातून सुटणाऱ्या सर्व एक्स्प्रेस गाड्यांना फेब्रुवारी अखेरपर्यंत चार जनरल डबे जोडण्याचे काम सुरु आहे. सध्या काही ठराविक गाड्यांना चार जनरल डबे जोडण्यात आले असून, लवकरच त्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना जागा मिळणार असून, त्यांची सोय होणार आहे.
कोरोनानंतर रेल्वे गाड्यांच्या डब्यांची संख्या कमी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक गाड्यांना दोनच जनरल डबे जोडण्यात आले होते. तर काही गाड्यांना जनरल डबेच नव्हते. त्यामुळे ऐन वेळी प्रवास करणाऱ्यांची अडचण होत होती. त्यामुळे प्रवाशांकडून जनरल डबे वाढविण्यासाठी वारंवार मागणी केली जात होती. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात होते. पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना खूपच गर्दी असल्यामुळे चार ते सहा जनरल डबे जोडावे, अशी मागणी प्रवाशांनी रेल्वे बोर्डाला केली होती. त्यानुसार बोर्डाने चार जनरल डबे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही गाड्यांना जनरल डबे बसविण्यात येत आहे.
पुणे रेल्वे विभागातून जवळपास ७३ गाड्या धावतात. त्यापैकी काही लोकल, तर काही साप्ताहिक तर काही दररोज सुटणाऱ्या आहेत. एक्स्प्रेस गाड्यांना जनरल डबे जोडण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली. त्यानुसार आतापर्यंत २४ रेल्वे गाड्यांना जनरल डबे जोडण्यात आले आहेत. यामध्ये दानापूर, हावडा, जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस, कन्याकुमारी, नांदेड, दरभंगा, जोधपूर, एर्नाकुलम व इतर गाड्यांचा समावेश आहे.
प्रवासी वाढणार
एका डब्यात ८० ते ८५ नागरिक प्रवास करतात. यापूर्वी रेल्वे गाड्यांना दोन डबे जोडण्यात येत होते. त्यामुळे एेनवेळी प्रवास करणाऱ्यांची अडचण होत होती. आता डब्यांची संख्या वाढल्यामुळे जवळपास ४०० नागरिक प्रवास करू शकतात. शिवाय चेंगराचेंगरी, जागेसाठी होणारी मारामारी या घटना कमी होण्याची शक्यता आहे.