मालवाहू ट्रक- टेम्पोच्या भीषण अपघातात चार जण ठार; नगर-कल्याण मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 15:31 IST2020-08-28T15:29:57+5:302020-08-28T15:31:09+5:30
पहाटे सव्वापाच वाजता झाला अपघात; ठार झालेले चारही जण नगरचे..

मालवाहू ट्रक- टेम्पोच्या भीषण अपघातात चार जण ठार; नगर-कल्याण मार्गावरील घटना
आळेफाटा : मालवाहू ट्रक आणि लहान टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले. नगर कल्याण महामार्गावर परिसरातील दांगटमळा येथे शुक्रवारी पहाटे सव्वापाचला ही घटना घडली.
आकाश सुरेश रोकडे (वय २४), सुरेश नारायण करंदीकर (वय ४२), सिध्दार्थ राजेश करंदीकर (वय २३), सुनील विलास उघडे उर्फ करंदीकर (वय २१, सर्व रा करंडी ता पारनेर जि.अहमदनगर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. आळेफाटा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजी वाहतुक करणारा लहान टेम्पो क्रमांक (एम.एच. १६ सी.सी. ६३८८) ओतुरहून आळेफाटा येथे जात होता. तर एक आशयर ट्रक (एम. एच. १६ ए. ई. ९०८०) कल्याणला भरधाव वेगाने जात होता. शुक्रवारी पहाटेच्या वेळी कल्याण नगर महामार्गावर वडगाव आनंद शिवारातील दांगटमळावस्ती येथे टेम्पो आणि ट्रकची जोरात धडक झाली. या अपघातात लहान टेम्पोमधील आकाश रोकडे, सुरेश करंदीकर, सिद्धार्थ करंदीकर व सुनील उघडे उर्फ करंदीकर या चौघांचा मृत्यू झाला. यापैकी २ जण जागेवरच ठार झाले. एकाचा आळेफाटा येथे दवाखान्यात नेत असताना तर एकाचा दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे पोलीसांनी सांगितले. या घटनेत आयशर ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला.
घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर पोलीस कर्मचा-यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरज रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलिसांनी ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार सतीश डौले करत आहे.