देवकरवाडी येथे वीजेच्या शाॅर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:57 IST2025-01-02T11:57:20+5:302025-01-02T11:57:50+5:30
संपूर्ण क्षेत्रातील ऊसाबरोबरच ठिबक सिंचन संच जळाला असून सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान

देवकरवाडी येथे वीजेच्या शाॅर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक
राहू - देवकरवाडी (ता.दौंड) येथे शेताच्या बांधावर असलेल्या ट्रान्सफार्मर मधील वीजवाहक तारांमध्ये घर्षणातून अचानकपणे झालेल्या शाॅर्टसर्किटमुळे चार एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याची घटना बुधवार (दि.१) रोजी दुपारच्या सुमारास घडली.आगीत ऊस तोडणीसाठी आलेल्या संपूर्ण क्षेत्रातील ऊसाबरोबरच ठिबक सिंचन संच जळाला असून सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी देवकरवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर मारुती मगर यांच्या उसाच्या शेताच्या बांधावरील असलेल्या ट्रान्सफार्मरमधील वीजवाहक तारांमध्ये दुपारच्या वेळी घर्षणाने शॉर्टसर्किट झाल्याने ऊसावर ठिणग्या पडून आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भरदुपारी उन्हाची तीव्रता असल्याने ऊसाच्या पाचटाने लगेच पेट घेत आगीचे डोंब उठून चार एकरच्या ऊसाची राख झाली आहे.ठिबक सिंचन संच,पीव्हीसी पाईप जवळपास ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.कार्यक्षेत्रातील कारखान्यांच्या शेतकी विभागाशी संपर्क केला असता लवकरात लवकर ऊस गळितास नेण्याचे नियोजन करु असे सांगण्यात आले असल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर मगर यांनी सांगितले असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.