माजी आमदार वसंत थोरात यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 09:51 IST2018-08-30T08:45:29+5:302018-08-30T09:51:50+5:30
माजी आमदार वसंत विठोबा थोरात यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

माजी आमदार वसंत थोरात यांचे निधन
पुणे : माजी आमदार वसंत विठोबा थोरात यांचे गुरुवारी (30 ऑगस्ट) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. थोरात यांच्या मागे त्यांची पत्नी अरुणा, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
मंडई म्हणजे वसंत थोरात असे समीकरण असलेल्या वसंत थोरात यांचा अखिल मंडई मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक कामात महत्वाचा वाटा होता. युद्ध व आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत पाठविण्यात त्यांचा सहभाग असे. काँग्रेसचे ते शहराध्यक्ष होते. 1974 -75 मध्ये ते महापौर झाले. मंडईमध्ये येणाऱ्या शेतकरी व गरीबांना किमान दोन घास खाता यावेत, या हेतूने महाराष्ट्रात प्रथम 1974 मध्ये झुणका भाकर केंद्र सुरु केले. तेव्हा त्यांनी महापौर चषक कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत 1977 ला त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. 1991 मध्ये ते आमदार झाले. शिवाजी मराठा सोसायटीचे ते मानद सचिव, अ. भा. मराठा शिक्षण परिषदेचे खजिनदार, सद्गुरू शंकर महाराज ट्रस्टचे विश्वस्त आणि बदामी हौद संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.