वडगाव काशिंबेग येथे एक वर्षाची मादी बिबट्या जेरबंद; आई आणि दुसरा बछडा अद्याप मोकाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:30 IST2025-11-12T18:29:30+5:302025-11-12T18:30:33+5:30
मंचर : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक वर्षाची बिबट्या मादी जेरबंद झाली आहे. पकडलेल्या बिबट्याची ...

वडगाव काशिंबेग येथे एक वर्षाची मादी बिबट्या जेरबंद; आई आणि दुसरा बछडा अद्याप मोकाट
मंचर : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक वर्षाची बिबट्या मादी जेरबंद झाली आहे. पकडलेल्या बिबट्याची आई आणि दुसरा एक बछडा अद्याप मोकाट असून त्याला पकडण्यासाठी दुपारी वन खात्याने या भागात पुन्हा पिंजरा लावला आहे.
श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे बिबट्याने धुमाकूळ घातला होता. पाळीव जनावरांवर हल्ला केल्याबरोबरच भटक्या कुत्र्यांचा फडशाही बिबट्याने पाडला होता. अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक मादी बिबट्या दोन बछड्यांसोबत फिरताना अनेक वेळा आढळली होती. बिबट्या वारंवार कोंबड्या फस्त करत होता. शिंदेवस्ती येथे बिबट्याचा वावर असल्याने स्थानिकांच्या मागणीवरून दोन दिवसांपूर्वी रामदास शिंदे यांच्या शेतात वन विभागाने पिंजरा लावला होता. सकाळी या पिंजऱ्यात मादी बिबट्या जेरबंद झाली आहे. बिबट्याच्या डरकाळीने स्थानिकांना बिबट्या पकडल्याची जाणीव झाली आणि त्यांनी ही माहिती वनविभागाला कळवली.
वन विभागाचे महेश मिरगेवाड, आदर्श जगताप, पूजा पवार तसेच गावडेवाडी बिबट शीघ्र कृती दलाचे सदस्य येऊन पाहणी केली. सदर बिबट्या अवसरी वनउद्यानात हलविण्यात आला आहे. दरम्यान पकडलेल्या बिबट्याची आई तसेच दुसरा एक बछडा अद्याप मोकाट आहे. एक बछडा पकडल्यामुळे मादी आक्रमक होण्याची शक्यता असून त्यामुळे स्थानिक नागरिक घाबरले आहेत. मादी आणि दुसऱ्या बछड्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने दुपारी या भागात पुन्हा पिंजरा लावला आहे. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.