'डिजिटल डिटॉक्स’, 'नो स्क्रीन डे' पाळाच! सोशल मीडियाचे व्यसन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 11:00 PM2020-03-03T23:00:00+5:302020-03-03T23:00:02+5:30

मानसोपचारतज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Follow 'Digital Detox', 'No Screen Day'! | 'डिजिटल डिटॉक्स’, 'नो स्क्रीन डे' पाळाच! सोशल मीडियाचे व्यसन

'डिजिटल डिटॉक्स’, 'नो स्क्रीन डे' पाळाच! सोशल मीडियाचे व्यसन

Next
ठळक मुद्देबिहेवियरल थेरपी, समुपदेशन, औषधोपचार आदी उपायांची गरज ‘फोन किंवा कॉम्प्युटरवर किती वेळ घालवायचा, याचे प्रत्येकाने स्वत:वर निर्बंध घालाकॅफेटेरिया, घरातील भोजनगृह, शयनकक्ष अशा ‘स्क्रीन’ न वापरणे आदी उपायांचा चांगला उपयोग

प्रज्ञा केळकर-सिंग - 
पुणे : जगभरात दररोज सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या २०१८ पर्यंत ३२६.१ अब्ज इतकी होती. २०२३ पर्यंत हा आकडा ४४८ अब्ज इतका वाढणार असल्याची शक्यता एका खाजगी सर्वेक्षणातून पुढे आली आहे. भारतातील नागरिक वर्षातील ७५ दिवस, तरुणाई दिवसातील ४-७ तास केवळ स्मार्टफोन वापरण्यात घालवतात असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. व्यतीत सोशल मीडियाचे व्यसन ही धोक्याची घंटा असून, डिजिटल डिटॉक्सिंग, नो स्क्रीन डे, नो स्क्रीन झोन हे उपाय वेगाने अवलंबण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी नोंदवले आहे.
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुढे सोशल मीडियावर सक्रिय राहणार नसल्याचे व्टिट केले. त्यांच्या या घोषणेनंतर सर्वच माध्यमांमधून चर्चेला उधाण आले. यानिमित्ताने आपण सोशल मीडियाशिवाय जगूच शकत नाही का, हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियाचा वापर व्यसन बनल्याचा आणि त्यातून मानसिक आजार उदभवत असल्याच्या अनेक घटना दररोज समोर येत आहेत. कुटुंबांमधील विसंवाद, नात्यांमधील दुरावा, नैराश्य, त्यातून होणा-या आत्महत्या अशा अनेक घातक परिणामांच्या काठावर आपण उभे असल्याचा निष्कर्ष पुढे येत आहे.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हिमानी कुलकर्णी म्हणाल्या, ‘सोशल मीडियाचे व्यसन लागण्याचे प्रमाण प्रत्येक वयोगटामध्ये वेगवेगळे असते. ज्येष्ठ नागरिक सर्वांशी कनेक्ट राहण्यासाठी, एकाकीपणा घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फेसबूक आणि व्हॉटसअ‍ॅपचा वापर करतात. मात्र, इंटरनेट वापरण्याचे पूर्णपणे ज्ञान नसल्याने अनेकदा त्यांची फसवणूक होऊ शकते. आभासी जगात एकमेकांशी संवाद साधणे सोपे झाले आहे. त्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर अवलंबून राहू लागली आहे. ‘सुडो इमेज’ दाखवण्याची धडपड, आयुष्यातील प्रत्येक घटना जगाशी शेअर करण्याची इच्छा अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. लहान मुले गेमिंगच्या विश्वात हरवून जातात आणि सोशल मीडियाशी कनेक्ट होतात. या सर्व गदारोळात मानसिक स्वास्थ्यासाठी डिजिटल डिटॉक्स अत्यंत गरजेचे बनले आहे. स्वत:ला वेळीच आवर न घेतल्यास बिहेवियरल थेरपी, समुपदेशन, औषधोपचार आदी उपायांची गरज भासू शकते.’
डॉ. सुजाता वाटवे म्हणाल्या, ‘फोन किंवा कॉम्प्युटरवर किती वेळ घालवायचा, याचे प्रत्येकाने स्वत:वर निर्बंध घालून घ्यायला हवेत. घरामध्ये ठरावीक वेळ ठरवून घेऊन त्यावेळी डिजिटल जगापासून दूर राहिले पाहिजे. आभासी जगात जगण्यापेक्षा प्रत्यक्ष समोर असलेल्या आपल्या माणसांशी संवाद साधला पाहिजे.’
.............
‘डिजिटल डिटॉक्स’च्या माध्यमातून इंटरनेटपासून लांब राहण्याची सवय स्वत:ला लावून घेणे अत्यंत आवश्यक आहे. हा कालावधी हळूहळू वाढवत नेता येतो. आपला संवाद सोशल मिडियावर अवलंबून नाही, हे एकदा समजून घेतले की त्यापासून दूर राहणे फार अवघड नाही. ६ महिन्यांमध्ये ८ दिवस किंवा वर्षभरात १५ दिवस ते एक महिना असे डिजिटल डिटॉक्सचे प्रयोग अनेक जण यशस्वीपणे करत आहेत. नो स्क्रीन डे अर्थात आठवड्यातून एक किंवा दोन दिवस स्क्रीनपासून पूर्णपणे दूर राहणे, ‘नो स्क्रीन झोन’ अर्थात ऑफिसमधील कॅफेटेरिया, घरातील भोजनगृह, शयनकक्ष अशा जागी ‘स्क्रीन’ न वापरणे या उपायांचा चांगला उपयोग होतो. आपण दिवसभरात किती वेळ ‘व्हर्च्युअल’ जगात राहिलो, हे दाखवून देणारी ‘अ‍ॅप्लिकेशन्स’ही वापरता येतात.
- मुक्ता चैतन्य, इंटरनेट अभ्यासक

Web Title: Follow 'Digital Detox', 'No Screen Day'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.