पूरस्थितीला केवळ हवामान आणि मान्सूनला जबाबदार धरता कामा नये : डॉ. रंजन केळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 07:00 AM2019-10-11T07:00:00+5:302019-10-11T07:00:04+5:30

ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्या ढगात एवढे पाणी असते जे शहराला बुडवू शकते.

Floods should not be blamed only on weather and monsoon: Dr. Ranjan Kelkar | पूरस्थितीला केवळ हवामान आणि मान्सूनला जबाबदार धरता कामा नये : डॉ. रंजन केळकर

पूरस्थितीला केवळ हवामान आणि मान्सूनला जबाबदार धरता कामा नये : डॉ. रंजन केळकर

Next
ठळक मुद्दे मुळातच 'ढगफुटी आणि अतिवृष्टी' या दोन वेगळ्या गोष्टी आहेत...

गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने पुणे शहर आणि परिसराला अक्षरशः झोडपून काढले.. यात अनेक दुर्घटना घडल्या, कुठे झाडे कोसळली तर कुठे भिंती खचल्या..ठिकठिकाणी पाणी साचले, तर कधी दुकाने, घरे,दवाखाने सर्वच ठिकाणी पाणी शिरले.. या सर्व अपघातांमुळे बरेच कुटुंब रस्त्यावर आले..  पै पै साठवलेली पुंजी रक्कम , काडी काडीने जमवलेला संसार असं सार काही एका क्षणार्धात उध्वस्त झाले.नेमकं पुण्यात काय घडतंय.. ? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत भारतीय हवामान खात्याचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांच्याशी साधलेला हा संवाद ..  

- नम्रता फडणीस     
* गेल्या काही वर्षात नैॠत्य मान्सूनचं गणित बदललंय का? 
_- यंदाच्या वर्षी मान्सून हा कुतुहलाचा विषय झाला असून, लोकांना आता तो त्रासदायक वाटायला लागलाय. यापूर्वी असा पाऊस कधी पडलाचं नव्हता का?  असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. हवामानशास्त्राच्या दृष्टीने सांगायचं झालं. प्रत्येक मान्सूनचं एक वैशिष्ट्य असतं, पाऊस एखाद्या वर्षी कधी अधिक तर कधी कमी पडतो. आताचा जो पाऊस पडत आहे. तो काहीसा निराळा आहे. मान्सून जेव्हा प्रस्थापित होतो. तेव्हा त्याचे ढग हे विस्तीर्ण असतात. शेकडो किलोमीटर  लांब पसरलेले हे ढग मध्यम उंचीचे असतात. त्यातून जो पाऊस पडतो तो सुखदायक आणि रिमझिम असतो. पण आगमन आणि परतीच्या पावसावेळचे  ढग काहीसे वेगळे असतात. जे छोटे, स्थानिक आणि 15 ते 16 किमी उंचीचे असतात त्यातून पाऊस पडतो तो एकाच ठिकाणी पडतो आणि मग स्थानिक भागात पाणी जमा होते. कारण त्याचा निचरा होत नाही. मग वृत्तपत्रात मथळे येतात  पुणे शहर पाण्यात तुंबले..! 
* एखाद्या भागात अधिक पाऊस झाला की तात्काळ 'ढगफुटी' किंवा 'अतिवृष्टी' झाली असे म्हटले जाते? 
- मुळातच 'ढगफुटी आणि अतिवृष्टी' या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अमुक एका वेगापेक्षा जास्त वेगाने पाऊस पडला तर त्याला अतिवृष्टी म्हणतात आणि ' ढगफुटी' ही बहुतांश वेळेला डोंगराळ भागात होते. ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्या ढगात एवढे पाणी असते जे शहराला बुडवू शकते. यावरून त्या ढगाचे वजन किती असेल याचा अंदाज येऊ शकतो. ढग एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. तेव्हा जमिनीच्या वरून जाणारे काही तरंग असतात जे ढगाला उचलून धरतात. एखाद्या डोंगराळ प्रदेशात जिथे तरंग जात नाहीत तिथे एखादे बूड काढल्यासारखे ढगातून पाणी पडते. हा फरक जाणून घेतला पाहिजे. त्यामुळे कुठेही जास्त पाऊस झाला तर 'ढगफुटी' झाली अशी धारणा ठेवू नये.   
* सप्टेंबरच्या अखेरीस इतका पाऊस का होत आहे? त्यामागची कारणे काय आहेत?
- खरंतर मान्सून म्हणजे दिशा बदलणारे वारे असतात. नैॠत्य मान्सून असे आपण म्हणतो तेव्हा नैॠत्यकडून वारे येतात आणि ते अरबी समुद्रावरचे बाष्प घेऊन महाराष्ट्रात येतात. मात्र सहा महिन्यांनी मान्सूनच्या वा-यांची दिशा बदलते आणि मग ईशान्य पूर्व भागाकडून मान्सूनचे वारे वाहायला लागतात. ज्याला ईशान्य मान्सून म्हणतात. जे महाराष्ट्रात पोहोचत नाहीत. ईशान्यकडून येणारे वारे हे बंगालच्या खाडीवरचे बाष्प घेऊन येतात. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणेला जो पाऊस होतो तो ईशान्य मान्सून होतो. नैॠत्य आणि ईशान्य हे दोन वेगळे मान्सून नाहीत तर ती केवळ स्थित्यंतरे आहेत. सप्टेंबरच्या शेवटी जे पाहात आहोत ते स्थित्यंतर आहे. मान्सूनला काही झालेले नाही तर तो परत चालला आहे. परतीच्या वेळेस मान्सूनच्या वा-यांची दिशा बदलते. आपल्याकडे सध्या वारे वाहात आहेत ते उत्तरेकडून येत आहेत. हवामानाच्या स्थित्यंतरामुळे वातावरणाची परिस्थिती बदलते. बाष्पीभवन, थोडी उष्णता अशी एक अस्थितरता असते. विजा चमकतात, गडगडाट होतो. पूर स्थितीला केवळ पाऊस आणि हवामानाला जबाबदार धरता कामा नये. बरेचसे दोष आपणच निर्माण केले आहेत. 
* अजून किती दिवस मान्सूनच्या या स्थितीचा सामना करावा लागेल?
-नैॠत्य मान्सूनचे रूपांतर ईशान्य मान्सूनमध्ये होण्यास सुरूवात झाली आहे. आजच्या परिस्थितीची गंभीरता काहीशी कमी होईल. 
*  ' हवामान बदल''  हा मान्सून बदलला कारणीभूत ठरतोय  का?
- आज ज्या गोष्टी घडत आहेत. त्या पूर्वीच कधी पाहिल्या नव्हत्या. कदाचित या पुन्हा होत राहातील अशी भीतीही वाटत राहाते. पण या गोष्टींना काहीही आधार नाही. हवामान खात्याकडे दीडशे वर्षांपूवीर्ची मान्सूनची आकडेवारी आहे. त्यातून हे दिसते की पूवीर्ही असे घडले आहे. त्यामुळे आज जे झाले ते पुन्हा होईल अशी भीती बाळगू नये. हवामानबदलामुळे मान्सूनवर विपरित परिणाम होतो  आणि दुष्काळ पडतो असंही म्हटलं जातं. पण यावर्षी दुष्काळ नव्हे तर महापूर आलाय. जेव्हा आपण हवामान बदल म्हणतो तेव्हा त्याला परिस्थितीही कारणीभूत असते. शेतकरी शेतीच्या पद्धतीही बदलत आहेत. उदा: मराठवाड्यात आंबा लावला जातो. हवामान बदलाबरोबर आपण जे इतर बदल केले आहेत तेही ध्यानात घेतले पाहिजेत.

Web Title: Floods should not be blamed only on weather and monsoon: Dr. Ranjan Kelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.