काळजाचा ठोका चुकवणारी घटना..! पाच वर्षांच्या मुलाने चालू केलेली कार रेल्वेला धडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 16:58 IST2019-07-11T16:52:57+5:302019-07-11T16:58:27+5:30
काळजाचा ठोका चुकवणारी घटना..बंद असलेल्या रेल्वे फाटकाजवळ कार थांबवून चालक उतरल्यावर त्याच्या पाच वर्षांच्या मुलाने ड्रायव्हिंग सीटवर येऊन कारची चावी फिरवली..

काळजाचा ठोका चुकवणारी घटना..! पाच वर्षांच्या मुलाने चालू केलेली कार रेल्वेला धडकली
यवत : खामगाव फाटा (ता. दौंड) येथे बंद असलेल्या रेल्वे फाटकाजवळ कार थांबवून चालक उतरल्यावर त्याच्या पाच वर्षांच्या मुलाने ड्रायव्हिंग सीटवर येऊन कारची चावी फिरवली. त्यामुळे चालू झालेली कार थेट रेल्वे फाटक तोडून समोरच्या मालगाडीला धडकली. त्याचदरम्यान सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस काही तेथे पोचणार होती. मात्र, गेटमन बाळासाहेब पाटील यांनी प्रसंगावधान दाखवून हुतात्मा एक्स्प्रेसला रेड सिग्नल दिला आणि हुतात्मा एक्स्प्रेसचे गेटजवळ येताच ब्रेक लागले आणि मोठा अनर्थ टळला. ही घटना आज (बुधवारी) सकाळच्या सुमारास घडली.
पुणे ते दौंड रेल्वेमार्ग दरम्यान खामगाव येथे रेल्वे गेट आहे. सदर गेट मालगाडी आल्याने बंद करण्यात आले होते. रेल्वे गेटमन बाळासाहेब पाटील यांनी पुण्याकडून सोलापूर बाजूकडे मालगाडी जाणार असल्याने रेल्वे गेट बंद केले होते. यावेळी खामगावकडे जाणारी कार (एम.एच. १२, एफ.यू. ४०००) ही बंद फाटकाजवळ येऊन थांबली. कारचालक किशोर माने गाडी बंद करून खाली उतरले होते. या वेळी त्यांच्या पाच वर्षांच्या लहान मुलाने ड्रायव्हिंग सीटवर येऊन कार चालू केली. त्यामुळे कारने रेल्वे गेटला धडक देत मालगाडीला अनेक वेळ धडक दिली.
...........
अपघात झाले तेंव्हा कारमध्ये लहान मुलासह तीन महिला गाडीत होत्या. याचवेळी दुसºया बाजूने सोलापूर- पुणे बाजूकडे हुतात्मा एक्स्प्रेस जाणार होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गेटमन बाळासाहेब पाटील यांनी रेल्वे गेटवरील आपत्कालीन यंत्रणेचा वापर केला. अपत्कालीन यंत्रणेचा वापर केल्याने हुतात्मा एक्स्प्रेस पुणे बाजूकडे जाण्यास सिग्नल नसल्याने गेटजवळ येऊन थांबली. घटनेची माहिती मिळताच पुणे रेल्वे डिव्हिजनचे अधिकारी सहर्ष बाजपेई, शैलेन्द्रकुमार सिंग, पी. बी. सिंग यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पी. बी. सिंग करत आहेत.