पुण्यातून पहिली रेल्वे कुंभमेळ्यासाठी रवाना; प्रवाशांचे जल्लोषात स्वागत
By अजित घस्ते | Updated: January 16, 2025 10:23 IST2025-01-16T10:20:26+5:302025-01-16T10:23:58+5:30
सायंकाळी सात वाजून ५० मिनिटांनी कुंभमेळा विशेष रेल्वे गाडी प्रयागराजच्या दिशेने रवाना

पुण्यातून पहिली रेल्वे कुंभमेळ्यासाठी रवाना; प्रवाशांचे जल्लोषात स्वागत
पुणे : कुंभमेळ्यासाठी पुण्यातून पहिली विशेष रेल्वे गाडी उत्तर प्रदेशातील प्रयागराजसाठी रवाना झाली. ढोल ताशांच्या गजरात, प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. आयआरसीटीसी-मार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून कुंभमेळ्यासाठी बुधवारी (दि. १५) सोडण्यात आली.
हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सायंकाळी सात वाजून ५० मिनिटांनी कुंभमेळा विशेष रेल्वे गाडी प्रयागराजच्या दिशेने रवाना झाली. ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते फीत कापून या गाडीचे उद्घाटन करण्यात आले. केंद्र शासनाच्या ''देखो अपना देश'' या योजनेअंतर्गत भारतगौरव ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. ही गाडी पुणे, वाराणसी, प्रयागराज, अयोध्या, पुणे अशी धावणार आहे. यावेळी रेल्वेच्या पुणे विभागाचे झोनल मॅनेजर गुरुराज सोन्ना व प्रवाशी उपस्थित होते.
रेल्वे गाडीत विशेष सुविधा
पुण्यातून कुंभमेळ्यासाठी विशेष गाडीचे नियोजन केले आहे. या गाडीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही, जेवणाची व्यवस्था असणार आहे. तसेच, कुंभमेळ्याच्या ठिकाणी राहण्यासाठी टेंटसिटीची व्यवस्था केली आहे. येथेही प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. प्रथमोपचार सुविधाही असणार आहे.
आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेने ही सुविधा उपलब्ध करून दिली. ही व्यवस्था अतिशय चांगली असून, रेल्वेची खूप खूप आभार.
- बाबू नाथ, प्रवासी