पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर पहिल्या इलेक्ट्रिक शिवाई एसटी धावण्यास सुरुवात
By नितीश गोवंडे | Updated: May 18, 2023 17:57 IST2023-05-18T17:56:49+5:302023-05-18T17:57:45+5:30
पुण्यातून सकाळी ०६:१५, ०७:१५, ०८:१५, ०९:१५ आणि १०:१५ अशा एक तासाच्या अंतराने छत्रपती संभाजीनगर साठी बस सुटतील

पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर पहिल्या इलेक्ट्रिक शिवाई एसटी धावण्यास सुरुवात
पुणे : एसटीच्या पुणे विभागात नुकत्याच नव्या इलेक्ट्रिक शिवाई बस दाखल झाल्या होत्या. त्या गुरुवारपासून पुणे ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर धावण्यास सुरुवात झाली. एसटीच्या वाकडेवाडी (शिवाजीनगर) बस स्थानकातून पाच गाड्यांना गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजता हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर या गाड्या छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी शिवाजीनगर आगाराचे वरिष्ठ व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणावरे, कार्यकारी अभियंता नागेश कुलकर्णी, शिव तिवारी, शिवेंदू यांच्यासह एसटीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर अशा इलेक्ट्रिक शिवाई बस सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून दर एक तासाने छत्रपती संभाजी नगरसाठी धावतील. या बसची रंगसंगती ही आकर्षक असून, ४५ सीटर असलेली ही बस आवाज विरहित (नो नॉईज पोल्युशन) आहे. या बस मध्ये पूर्णतः वातानुकूलित, पुश बॅक बकेट सीट, पुढील व पाठीमागील बाजूस मराठी व इंग्रजीमधून मार्ग फलक, रीडिंग लँपची सुविधा, प्रवाशांसाठी इमर्जन्सी पॅनिक बटन, एलईडी फुट लॅम्प, इनसाईड लगेज रॅक, तसेच बसच्या बाहेरील बाजूस मोठ्या बॅग व सामानासाठी प्रशस्त सामानाची डिकी, इमर्जन्सी हॅमर, प्रवाशांच्या माहितीसाठी चालक केबिन मधून आवश्यक सूचनांसाठी अनाउन्समेंट सिस्टम अशा सुविधा आहेत. या ई-शिवाई बसचे प्रवास भाडे मात्र शिवशाही प्रमाणेच ठेवण्यात आले आहे.
पुण्यातून सकाळी ०६:१५, ०७:१५, ०८:१५, ०९:१५ आणि १०:१५ अशा एक तासाच्या अंतराने छत्रपती संभाजीनगर साठी बस सुटतील. त्याचवेळेत छत्रपती संभाजीनगर येथून दुसर्या पाच बस पुण्याकडे सुटतील. संभाजीनगर येथील बस पुण्यात दाखल झाल्यानंतर या ई-बस पुन्हा एका तासाच्या अंतराने सायंकाळी ०७.१५ पर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने सुटतील, अशी माहिती पुणे विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली.