पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 15:30 IST2021-05-12T15:20:03+5:302021-05-12T15:30:11+5:30
पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार
पिंपरी: पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना आज (बुधवारी, दि. 12) दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली.
तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे माहिती समोर येत आहे. आरोपीने पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या आहेत.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तूलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. पोलीस तपास करीत आहेत.
पिंपरीचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने पिस्तूलातून गोळी झाडली. मात्र या घटनेत कुणी जखमी झाले नाही. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून शस्त्र जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच या घटनेबाबतची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली असून, खळबळ उडाली आहे.