चाकण : दोन गाड्यांच्या झालेल्या अपघातात गाडीची नुकसान भरपाई मिळू न दिल्याचा राग मनात धरून आंबेठाण ( ता. खेड ) येथे एकाने केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूल मधून जीवघेणा हल्ला केला.या घटनेत चुलत भाऊ मोठ्याने ओरडल्याने पिस्टल मधील गोळी हवेत फायर झाल्याने सुदैवाने एकाचे प्राण वाचले आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना शुक्रवारी ( दि. २१ ) रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आंबेठाण गावात घडली. याबाबत शांताराम दत्तात्रय चव्हाण ( वय ३३ वर्षे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निलेश उर्फ जगु नवनाथ मांडेकर ( वय २६ वर्षे ) यास अटक करण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि, अपघातात झालेल्या आरोपीच्या गाडीचे नुकसान भरपाई मिळू न दिल्याचा राग मनात धरून मांडेकर याने आपल्या कडील गावठी कट्टा हा फिर्यादी चव्हाणच्या डोक्यास लावला. त्यावेळी फिर्यादीचे सोबत असणारे चुलत भाऊ गणेश चव्हाण मोठ्याने ओरडल्याने फिर्यादीने आरोपीचा हाताला धक्का दिल्याने पिस्टलमधून गोळी हवेत फायर झाली. आरोपीच्या हातातून गावठी कट्टा हिसकावून घेत असताना आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पिस्तुलाने गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीला अटक करण्यात आली असून खेड न्यायालयाने २४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
आंबेठाणमध्ये केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूलने खुनी हल्ला : आरोपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 17:14 IST