पुण्यातील रविवार पेठेत जुन्या वाड्याला भीषण आग; एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 01:40 IST2020-09-12T01:39:26+5:302020-09-12T01:40:13+5:30
रविवार पेठेतील मिरा दातर दर्ग्याजवळील जुन्या वाड्याला शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता भीषण आग लागली.

पुण्यातील रविवार पेठेत जुन्या वाड्याला भीषण आग; एकजण जखमी
पुणे: रविवार पेठेतील मिरा दातर दर्ग्याजवळील जुन्या वाड्याला शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता भीषण आग लागली. या आगीत एक जण जखमी झाला. छोट्या रस्त्यांमुळे अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचू शकत नव्हते. मात्र जवानांनी मोठी पाईपलाईन टाकून प्रत्यक्ष ठिकाणी पाण्याचा मारा सुरू केल्याने आग विझवण्यास यश मिळाले.
रविवार पेठेमध्ये लाकडाचे बांधकाम असलेला हा तीन मजली वाडा आहे. तिसऱ्या मजल्यावरील घराला आग लागल्याने काळा धूर येण्यास सुरुवात झाली. अग्निशामक दलाची गाडी बोलावण्यात आली. मात्र वाहनाला अरुंद रस्त्यांमुळे घटनास्थळी पोहोचणे अवघड झाले. जवानांनी तात्काळ मोठी पाईपलाईन टाकून पाण्याचा मारा सुरू केला. त्याचप्रमाणे धोका दूर करून ८ सिलेंडर बाहेर काढले. लाकडी वाडा असल्याने वॉटर टँकर ची मदत घेण्यात आली. धूर बाहेर जाण्यास अडचण येत असल्याने घरावरचे पत्रे उचकटून आगीला बाहेर जाण्याचा रस्ता करून देण्यात आला..जवानांना आग विझवण्यात यश मिळाले. आगीमध्ये घरगुती साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार मेणबत्ती चालू राहिल्याने आग लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, युनूस युसूफ शेख यांना रुग्णालयात नेण्यासाठी १०८ वाहन उपलब्ध न झाल्याने त्यांना खासगी गाडीतून ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दलाचे अधिकारी प्रकाश गोरे, फायरमन गावडे, मनीष बोंबले, राजेश कांबळे, अजीम शेख आणि वाहनचालक मोहिते यांनी ही कामगिरी केली.
.....