पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना, कोंढव्यात इमारतीत पाच महिलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 19:42 IST2024-12-18T19:41:56+5:302024-12-18T19:42:27+5:30
पुण्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही

पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना, कोंढव्यात इमारतीत पाच महिलांची सुटका
पुणे : शहरात बुधवारी (दि. १८) पहाटे दोन ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या. वारजे भागातील एका मंडप साहित्याच्या गोदामाला आग लागली. ही आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाचा जवान किरकोळ जखमी झाला. दुसऱ्या घटनेत कात्रज भागातील एका प्लायवूडच्या गोदामाला आग लागली. पुणेअग्निशमन दल, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) जवानांनी आग आटाेक्यात आणली.
वारजे भागातील दांगट पाटीलनगर परिसरात असलेल्या मंडप साहित्याच्या गोदामाला पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मंडप साहित्याने पेट घेतल्याने आग भडकली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणताना वारजे अग्निशमन केंद्रातील जवान अक्षय गायकवाड यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कात्रजमधील मांगडेवाडी परिसरात एका प्लायवूडच्या गोदामाला आग लागल्याची माहिती पहाटे साडेचारच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्राला मिळाली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकले नाही. कोंढव्यातील भाग्योदय परिसरात एका इमारतीत मंगळवारी दुपारी आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या तीन वर्षांच्या बालकासह पाच महिलांची सुटका केली होती.