पुणे शहरात बेकायदा मद्यविक्री आणि वाहतूक, भाजप आमदाराने विधिमंडळात उठविला आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 16:29 IST2021-03-10T16:16:34+5:302021-03-10T16:29:51+5:30
विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न

पुणे शहरात बेकायदा मद्यविक्री आणि वाहतूक, भाजप आमदाराने विधिमंडळात उठविला आवाज
धायरी: शहरांमध्ये विनापरवाना मद्यविक्री सुरु असून, बेकायदेशीर मद्य वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने राज्य शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात असा प्रश्न आमदार भिमराव तापकीर यांनी उपस्थित केला.
पुणे शहरात विनापरवाना मद्यविक्री होते. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. अशी विचारणा तापकीर यांनी संबंधित मंत्र्यांना केली.
आमदार भीमराव तापकीर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरती दिलीप वळसे पाटील यांनी हे अंशत: खरे असल्याचे सांगितले. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे शहरात १ जानेवारी २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक करणाऱ्या संबंधितांविरुध्द एकूण ५३ गुन्हे नोंदविले आहेत. या गुन्हयातील ३३ आरोपींना अटक केली असून ७ लाख ८८ हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये एकूण ५०१ गुन्हे नोंदविले असून गुन्हयांतील ३२० आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी एकूण १७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाई दरम्यान १ कोटी १४ लाख १३ हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.