अखेर सीबीएसईच्या काही शाळांना शासन निर्णय मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:06 IST2025-06-02T17:06:19+5:302025-06-02T17:06:59+5:30

या शाळांनी ५ जूनऐवजी ११ व १६ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला

Finally, some CBSE schools accept the government decision | अखेर सीबीएसईच्या काही शाळांना शासन निर्णय मान्य

अखेर सीबीएसईच्या काही शाळांना शासन निर्णय मान्य

- दीपक होमकर 

पुणे :
सीबीएसईशी संलग्न शाळांनी उन्हाळ्याच्या सुट्या संपवून शाळा सुरू करण्याचा दिवस त्यांच्या सोयीने ठरविला आहे. त्यामुळे एकाच परिसरातील शाळा सुरू करण्याच्या तारखा वेगवेगळ्या झाल्या आहेत. या मनमानी कारभाराबद्दल ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर काही शाळांनी त्यांचा निर्णय बदलला असून, राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार १६ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा मेसेजही शाळेने पालकांच्या अधिकृत व्हाॅट्सॲप ग्रुपवर टाकला आहे.

राज्यातील सर्व शाळा १६ जून रोजी सुरू करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला होता. त्यानुसार एसएससी पॅटर्नच्या शाळांनी १६ जून रोजी शाळा सुरू करण्याची तयारी केली. मात्र, दुसरीकडे सीबीएसई संलग्न शाळांनी राज्य शासनाच्या आदेशाला बासनात गुंडाळले असून, त्यांच्या सोयीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि २ जूनपासून ते २१ जूनपर्यंत विविध तारखांना शाळा सुरू करण्याची सूचना पालकांना दिली आहे. सीबीएसईचे पॅटर्ननुसार शाळा सुरू करणार असल्याचे कारण या शाळांनी सांगितले असले तरी ‘सीबीएसई’ तरी शाळांना वेगवेगळ्या तारखा दिलेल्या नाहीत. केंद्रीय विद्यालयांना मात्र २१ जून रोजी शाळा सुरू करण्याच्या सूचना असल्याने पुण्यातील सर्व केंद्रीय विद्यालये २१ जून रोजी सुरू होणार आहेत. केंद्रीय विद्यालयांना शाळा २१ जून रोजी सुरू करण्याच्या सूचना असेल तर सीबीएसई संलग्न एकाच शहरातील शाळांना २ जून, ५ जून, ११ जून, ९ जून, ११ जून अशा विविध तारखा कशा काय दिल्या गेल्या हाच प्रश्न आहे. त्यामुळे सीबीएसई संलग्न शाळांकडून पालकांची आणि राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट होते.

शिक्षण उपसंचालक अन् शिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का?

सीबीएसई संलग्न शाळा असल्या तरी शाळांची मान्यता, शिक्षकांची मान्यता, अपार आयडी, शालार्थ आयडी या साऱ्या बाबी शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्याकडून पूर्ण कराव्या लागतात. या शाळाच्या मान्यता देण्याचे व मान्यता रद्द करण्याचे अधिकारही शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांना आहेत. तरीदेखील शिक्षण विभागाकडून या शाळांचे शुल्क, एनसीईआरटी व्यतिरिक्तची अवास्तव महागडी पुस्तके याकडे सोयीने दुर्लक्ष होत आहे, त्याबाबत पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.


शासन निर्णय मान्य करणाऱ्या शाळांची नावे अशी

एसव्ही युनियन हायस्कूल, सोमवार पेठ,ग्रीनवूडस् स्कूल, हडपसर

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागर

Web Title: Finally, some CBSE schools accept the government decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.