चित्रपट रिव्ह्यू दिल्यास चांगला मोबदला मिळेल; आमिष दाखवत एकाची २१ लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: May 7, 2023 17:20 IST2023-05-07T17:19:34+5:302023-05-07T17:20:43+5:30
एक लिंक पाठवत टेलिग्रामवरील ग्रुपवर ऍड करून फिर्यादीला डिपॉझिट भरण्यास सांगण्यात आले होते

चित्रपट रिव्ह्यू दिल्यास चांगला मोबदला मिळेल; आमिष दाखवत एकाची २१ लाखांची फसवणूक
पुणे : मागील काही दिवसांपासून टास्क फ्रॉड चे गुन्हे वाढत असल्याचे चित्र रोज नोंद होणाऱ्या तक्रारींवरून दिसत आहे. एका ४२ वर्षीय तरुणाची चित्रपटाला रिव्ह्यू दिला तर पैसे देण्याचे आमिष दाखवत २१ लाख ३३ हजार ८८० रुपयांची फसवणूक केल्याची घटना शुक्रवार पेठ परिसरात घडली आहे.
भूषण सुभाष मेटे (वय ४२, रा.शुक्रवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना अनोळखी नंबर वरून व्हाट्सअँप वर मेसेज आला होता. चित्रपटाला रिव्ह्यू देऊन टास्क पूर्ण केले तर चांगला मोबदला मिळेल असे मेसेजमध्ये लिहिलेले होते. एक लिंक पाठवत टेलिग्रामवरील ग्रुपवर ऍड करून भूषण यांना डिपॉझिट भरण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला जमा केलेल्या रकमेचा परतावा देऊन आरोपीने भूषण यांचा विश्वास संपादन केला. त्यांनतर वेगवेगळी कारणे देऊन विविध बँक खात्यांवर एकूण २१ लाख ३३ हजार ८८० रुपये जमा करून घेतले. मात्र काही काळानंतर जमा केलेल्या पैशांचा मोबदला मिळत नाही म्हणून भूषण यांनी अनोळखी मोबाईल क्रमांकावर फोन केला असता प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनतर भूषण यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेल्या संपूर्ण प्रकराचा जबाब दिला. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चुडाप्पा हे पुढील तपास करत आहेत.