अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या चित्रपट दिग्दर्शक शंतनू पांडेला अटक; खंडणी विरोधी पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 21:53 IST2021-07-16T21:51:44+5:302021-07-16T21:53:57+5:30
शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी आणि कुटुंबाला त्रास देण्याची धमकी देऊन 7 लाख 20 हजार रूपयांची मागणी

अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या चित्रपट दिग्दर्शक शंतनू पांडेला अटक; खंडणी विरोधी पथकाची कारवाई
पुणे : हात उसने स्वरूपात 6 लाख रूपये 5 टक्के व्याजाने दिले असताना मोबदल्यात 7 लाख 40 हजार रूपये परत करूनही शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देऊन 7 लाख 20 हजार रूपयांची खंडणी मागणाऱ्या चित्रपट लेखक-दिग्दर्शकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली.
शंतनू वसंत पांडे ( रा. फ्लँट नं 401 करन वुडस, मुंबई बँगलोर हायवे वारजे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी अवैधरित्या सावकारी
व्यवसाय करून सर्वसामान्यांची पिळवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. रविराज रघुनाथ साबळे ( रा. फुगेवाडी दापोडी) यांनी खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखेकडे पांडे याच्याविरूद्ध तक्रार केली होती. पांडे याने दिलेली 6 लाख रूपयांची रक्कम मुददल आणि व्याजासह त्याला परत केली होती. मात्र पुन्हा पांडे याने शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी आणि कुटुंबाला त्रास देण्याची धमकी देऊन 7 लाख 20 हजार रूपयांची मागणी केली. जोपर्यंत तू मला पूर्णपणे पैसे देत नाहीस तोपर्यंत दररोज 2 हजार रूपये दयावे लागतील असे म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी देत खंडणी मागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. साबळे यांच्या तक्रारीवरून पांडे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार संपत अवचरे, विजय गुरव, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ, भूषण शेलार, मोहन येलपल्ले आणि रूपाली कर्णवर या खंडणी विरोधी पथक 2 ने केली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------