फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर दारूचा अड्डा; एका महिन्यात सापडल्या तब्बल ८०० दारुच्या बाटल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 14:42 IST2022-01-24T14:40:01+5:302022-01-24T14:42:06+5:30
कोरोना काळात महाविद्यालये बहुतांशी बंदच होती. तरी देखील एक धक्कादायक आकडेवारीमुळे खळबळ उडाली आहे

फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर दारूचा अड्डा; एका महिन्यात सापडल्या तब्बल ८०० दारुच्या बाटल्या
तन्मय ठोंबरे
पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय हे आपल्या शैक्षणिक वारश्यासाठी प्रसिद्ध आहे. तरुणाईमध्ये फर्ग्युसन रस्ता हा फॅशन आयकॉनसाठी प्रसिद्ध आहेच. या परिसरामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयासोबतच बीएमसीसी महाविद्यालयासारखी शैक्षणिक संकुले आहेत. तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाचले आहे. कोरोना काळात महाविद्यालये बहुतांशी बंदच होती. तरी देखील एक धक्कादायक आकडेवारीमुळे खळबळ उडाली आहे. फर्ग्युसन मैदान ते फर्ग्युसन टेकडी परिसरात एका महिन्यात तब्बल आठशेहुन अधिक दारूच्या बाटल्या सापडल्याची माहिती पुणे प्लॉग्गेर्स संस्थेने दिली आहे.
सन २०२१ डिसेंबर महिन्यामध्ये ५०० बाटल्या आणि जानेवारी २०२२ मध्ये तब्बल ३५० बाटल्या सापडल्या आहे. ह्या सर्व बाटल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारातील आहे. बाटल्यांसह प्लास्टिक कचरा देखील २५० किलो जमा करण्यात आला आहे. ग्राउंड ते फर्ग्युसन टेकडी परिसरात एका महिन्यात या बाटल्या सापडल्या आहेत.
संस्था शहरातील कचरा साफ करण्याची मोहीम दर शनिवार आणि रविवारी राबवते
पुणे प्लॉग्गेर्स नावाची संस्था २०१९ पासून शहरातील कचरा साफ करण्याची मोहीम दर शनिवार आणि रविवारी राबवत आहे. पुण्यातील नदी काठी, प्रमुख रस्ते, गर्दीचे ठिकाण, महाविद्यालय अश्या सर्व ठिकाणचे साफ सफाईचे काम करीत आहेत. या संस्थेमध्ये साठहुन अधिक तरुण, लहान मुले आणि वयोवृद्ध आहेत. हा कचरा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. बाटल्यामधून टाकाऊ मधून टिकाऊ वस्तू तयार केल्या जातात. ज्या कलात्मक असतात. या वस्तूंमध्ये प्रामुख्याने शोभेचे दिवे, फुलदाणी बनवले जाते.