कारखाली सापडून महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; दुसऱ्या गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 13:23 IST2024-03-03T13:23:43+5:302024-03-03T13:23:51+5:30
महाविद्यालयात प्राचार्यांची कार पार्किंग करीत असताना कर्मचाऱ्याकडून घडला पार्किंग

कारखाली सापडून महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; दुसऱ्या गंभीर जखमी
हडपसर : अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्राचार्यांची कार पार्किंग करीत असताना कर्मचाऱ्याकडून झालेल्या अपघातात एका महिला कर्मचाऱ्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर दुसरी प्राध्यापक महिला जखमी झाली आहे.
शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शालन दत्तात्रय शेलार (वय ५०, रा.देलवडी, ता.दौंड, सध्या हडपसर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे, तसेच जखमी महिला प्रा.इरफाना शब्बीर मुल्ला (वय ३२, रा.गुलामअलीनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे हे कारने मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या कार्यालयासमोर आले. तेथे कारमधून उतरत त्यांनी महाविद्यालयातील सेवक राहुल जाधव याच्याकडे कार पार्किंग करण्यासाठी दिली. त्यानंतर, शिपाई सीमा देशमुख हिने राहुलकडून चावी घेऊन महाविद्यालयाच्या मैदानात स्वत: कार चालविण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी नियंत्रण सुटल्याने समोर चालत असलेल्या प्रा.मुल्ला यांना धडक देऊन कार सुसाट वेगात महाविद्यालयाच्या जिन्याजवळील वॉश बेसिनच्या भिंतीला धडकली. त्यावेळी बेसिनवर कर्मचारी शालन शेलार हात धूत होत्या. त्यांना पाठीमागून कमरेखाली कारची धडक बसल्याने त्यांच्या दोन्हीही पायांचा चेंदामेंदा झाला. यानंतर, दोघींनाही तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शालन शेलार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. हडपसर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.