Pune: ईडीकडून कारवाईची भीती; ज्येष्ठ महिलेची तब्बल ३२ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 20:28 IST2025-09-12T20:28:17+5:302025-09-12T20:28:33+5:30
कारवाई न करण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले

Pune: ईडीकडून कारवाईची भीती; ज्येष्ठ महिलेची तब्बल ३२ लाखांची फसवणूक
पुणे: ईडी कडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची ३२ लाख सहा हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिलेच्या मोबाईल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी फेब्रुवारी महिन्यात संपर्क साधला. महिलेच्या नावाने एका कंपनीची नोंदणी झाली आहे. त्यांच्या नावाचा गैरवापर करुन (आयडेंटीटी थेफ्ट) एका बँकेत खाते उघडण्यात आले आहे. महिलेच्या बँक खात्यातून काळ्या पैशांचा व्यवहार करण्यात आला आहे. या प्रकरणात ईडीकडून महिलेविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, अशी भीती सायबर चोरट्यांनी महिलेला दाखवली.
त्यानंतर महिलेच्या बँक खात्याची पडताळणी करण्यात येणार असल्याचे सांगून गोपनीय माहिती घेतली. कारवाई न करण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात गेल्या सात महिन्यात वेळोवेळी ३२ लाख सहा हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम पुढील तपास करत आहेत.