पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 10:25 IST2025-04-21T10:24:38+5:302025-04-21T10:25:56+5:30

Mumbai-Pune Highway Accident: पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Fatal accident on Pune Mumbai highway Truck hits 5 vehicles Father and daughter die 12 injured | पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी

पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी

Khandala Accident Update: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसंच १२ प्रवासी जखमी झाले आहेत. खंडाळा बोर घाटातील बॅटरी हिल परिसरात रविवारी रात्री उशिरा ट्रकने पाच वाहनांना धडक दिल्याने हा अपघात झाला असून सदर अपघातात बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातील जखमींवर सध्या लोणावळ्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे-मुंबई  महामार्गावरील बॅटरी हिल इथं रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या  सुमारास पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने या ट्रकने इनोव्हा कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. तसंच अलिबागवरून पुण्याकडे जाणाऱ्या इर्टिका कारलाही फरफटत नेले. त्यानंतर समोरून येणाऱ्या टाटा पंच या कारलाही धडक दिली आणि एका रिक्षाचेही नुकसान केले.

या भीषण अपघातात इर्टिका कारमधील बाप-लेक जागीच मृत झाले आहेत. तसंच अन्य १२ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील मयत व जखमी व्यक्तींना आयआरबी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांमधून काढून श्री हॉस्पिटल आणि संजीवनी हॉस्पिटल, लोणावळा या ठिकाणी दाखल करण्यात आले.

दरम्यान, या अपघातात बाप-लेकीने आपला जीव गमावल्याने हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
 

Web Title: Fatal accident on Pune Mumbai highway Truck hits 5 vehicles Father and daughter die 12 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.