खे़ड-शिवापूर टोलनाक्यावर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित, स्थानिकांना तूर्तास टोल सक्तीतून दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 08:40 PM2021-02-16T20:40:44+5:302021-02-16T20:46:44+5:30

स्थानिकांकडून जर टोल आकारला तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल.

Fast tag system operational at Khed-Shivapur toll plaza, locals relieved of toll | खे़ड-शिवापूर टोलनाक्यावर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित, स्थानिकांना तूर्तास टोल सक्तीतून दिलासा

खे़ड-शिवापूर टोलनाक्यावर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित, स्थानिकांना तूर्तास टोल सक्तीतून दिलासा

googlenewsNext

खेड- शिवापूर  : राज्यातील वाहनचालक आणि वाहतूक चालकांना काल मध्यरात्रीपासून (दि.१५) रात्री १२ वाजल्यापासून शिवापूर टोलनाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केल्याने वसुली धडाक्यात सुरू होती. मात्र, ज्या वाहन चालकांनी तो भरलेला नव्हता. त्यांच्याकडून दाम दुप्पट वसूल केली जात होती. तर अनेकांनी टोल भरणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे टोल नाक्यावर वाद होत होते. काही वेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण होऊन वाहतूक व्यवस्था कोलमडली. 

खेड-शिवापूर येथील टोल नाक्यावर स्थानिक व रोखीने फास्ट भरणाऱ्यांना दोन लेन ठेवल्या होत्या तर उर्वरित फास्टटॅग भरणाऱ्यांसाठी लेन उपलब्ध केल्या होत्या. मात्र रोखीने फास्ट टॅग भरणाऱ्यांची लेन मात्र लांबच लाब होती. देशभरात फास्ट टॅग अनिवार्य केला गेला असला तरी अनेक वाहनचालकांना याबाबत पूर्ण कल्पना नसल्याने गोंधळाचे चित्र होते.

मंगळवार (दि.१६ ) पासून खेड - शिवापूर टोलनाक्यावर सर्व लेन फास्टटॅग केल्या आहेत. फास्टॅगमुळे प्रत्येक वाहन कमी वेळेत टोल पार करत होते. यामुळे खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहतूक सुरळीत चालू होती. ज्या वाहनांचा फास्टॅग स्कॅन होत नव्हता. त्या वाहनांजवळ जाऊन स्कॅन केला जात होता. पूर्वीच्या नियमानुसार स्थानिक वाहनांना (MH-12 व MH-14) मोफत सोडण्यात येत होते. मात्र , अजूनही अनेक वाहनांनी फास्टॅग काढला नसल्याने त्या वाहनांसाठी दोन लेन सोडण्यात आल्या होत्या. 

फास्टॅगबाबत टोल प्रशासनाचे व्यवस्थापक अमित भाटिया म्हणाले, सरकारच्या नियमानुसार सर्वच लेन ह्या फास्टॅग करणार आहे, अथवा केल्या आहेत. ज्या वाहनांनी तो काढला नाही त्यांच्याकडून दुप्पट टोल घेत आहोत. स्थानिकांना ज्याप्रमाणे पूर्वी मोफत सोडत होतो त्यांना आजही मोफतच सोडत आहे. मात्र, फास्टटॅग नियम सुरू झाला असल्याने त्यांनाही मी विनंती करत आहे की, केवळ २७५ रुपयांमध्ये आपण मासिक पास देणार आहोत याचा फायदा स्थानिक नागरिकांनी घ्यावा.

शहरातील गाड्यांना पण फास्टॅग सक्ती , हे काय चाललंय नक्की? 
 केंद्रीय मोटर वाहन नियमावलीनुसार तुमची चारचाकी गाडी  जरी कधी टोलरोड वर जाणार नसेल , तुम्ही अगदी फक्त शहरातच गाडी चालवत असाल  तरी तुम्हाला २०० रूपये खर्च करून फास्टॅग बसवावाच लागेल , त्याशिवाय विमा नुतनीकरण होणारच नाही , एवढंच नाही तर अशी फास्टॅग नसलेली गाडी शहरात पकडली गेली तर पहिल्यांदा ३०० रुपये आणि दुसर्यांदा पकडली गेली तर ५०० रुपये दंड होईल. दरवर्षी वाढत चाललेल्या विमा हप्त्यावर हा आणखी एक भुर्दंड पडणार आहे. 
विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच 

.... 

... तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल.

सध्या तरी MH-12 व MH-14 नंबर असलेल्या वाहनांना मोफत सोडत आहेत. त्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाने सांगितल्यानुसार,  संघर्षाची भूमिका घेणार नाही. मात्र स्थानिकांकडून जर टोल आकारला तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल. स्थानिक पातळीवरील वाहनांना चार स्वतंत्र मार्गिका सोडण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन आजच जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. पुढील चार दिवसात आमदार, खासदार यांना घेऊन जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटकर म्हणाले.

 

 

Web Title: Fast tag system operational at Khed-Shivapur toll plaza, locals relieved of toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.