पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा, एजंट फरार, इंदापूरातील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:43 IST2024-12-13T12:43:25+5:302024-12-13T12:43:52+5:30

शेतकऱ्यांकडून पाचशे, हजार कोणाकडून दोन हजार तर काही जणांकडून चार हजार असे पैसे उकळून बोगस विमा एजंट फरार झाले

Farmers were duped of lakhs in the name of crop insurance the agent is absconding a sensational incident in Indapur | पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा, एजंट फरार, इंदापूरातील खळबळजनक घटना

पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा, एजंट फरार, इंदापूरातील खळबळजनक घटना

भिगवण : पीक विमा कंपनीकडून आलो आहे. तुमच्या नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून हेक्टरी ८० हजार पीक विमा मिळवून देऊ, असे शेतकऱ्यांना आश्वासन देऊन प्रत्येकी ७/१२ धारक शेतकऱ्यांकडून पाचशे, हजार कोणाकडून दोन हजार तर काही जणांकडून चार हजार असे पैसे उकळून बोगस विमा एजंट फरार झाले. त्यानंतर अद्यापपर्यंत पीक विमा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आता दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. इंदापूर तालुक्यातील पोंधवडी, मदनवाडी गावात ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात हा प्रकार घडला आहे.

हा प्रकार इंदापूर तालुक्यातील घडला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तविली जात असून याबाबात दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधला असता असा कोणताही पंचनामा झाला नसल्याचा सांगण्यात येत आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करायचे झाल्यास प्रतिनिधींची नावे देखील माहिती नाहीत. एकच पीक दाखवून अनेक शेतकऱ्याचे फोटो एकाच ठिकाणी फोटो देखील काढण्यात आले आहेत.

पीक विम्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीची बाब उजेडात येऊ लागली आहे. हा प्रकार आजू-बाजूच्या अनेक गावांमध्ये झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या बोगस सर्वेक्षणाच्या नावाखाली लाखो रुपये शेतकऱ्यांकडून गोळा केले आहेत. या प्रकाराबाबत फसवणूक झालेले शेतकरी एकत्र येऊन पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करणार असल्याचे शेतकऱ्यांनी दैनिक ‘लोकमत’ला सांगितले.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

नुकसान भरपाईचे पैसे विधानसभा निवडणुकीपूर्वी पैसे जमा होतील असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र, अद्यापही कोणाच्याही खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा झाले नसल्याने बँकेत कृषी विभागाच्या ऑफिसला गेल्यानंतर शेतकऱ्यांना कळाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. या प्रकरणामागील सूत्रधार शोधून सरकारकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

मी शासनाच्या खरीपमध्ये कांदा पिकाचा १ रुपयात पीक विमा उतरवला होता. नुकसान झाल्यानंतर तुम्हाला लाभ मिळवून देऊ असे बोलून चहापाणी द्या म्हणून माझ्याकडून पाचशे, भावाकडून दोन हजार घेऊन गेले. -नवनाथ भोसले, शेतकरी, पोंधवडी

विमा उतरविल्याची यादी घेऊन कंपनीकडून आलो आहोत असे भासवून हेकटरला ८० हजार नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे सांगून एक हजार रुपये घेऊन गेले, असे गावातील ७० ते ८० जणांकडून पैसे घेऊन गेले आहेत. -गजानन खारतोडे, शेतकरी, पोंधवडी

असा प्रकार निमगाव केतकीमध्ये मागील काही दिवसांपूर्वी घडला होता. त्यावर आम्ही तात्काळ कृषी आयुक्तालायामार्फत कारवाई केली. असा प्रकार घडू नये यासाठी आम्ही जनजागृती करत शेतकऱ्यांनी एक रुपयांही देऊ नये, असे आव्हान शेतकऱ्यांना केले होते. मात्र, या गावांमध्ये असे प्रकार घडले असेल तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. -भाऊसाहेब रुपनवर, तालुका कृषी अधिकारी, इंदापूर

Web Title: Farmers were duped of lakhs in the name of crop insurance the agent is absconding a sensational incident in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.