खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात कुटुंबाने गमावला आधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 20:31 IST2018-08-30T20:25:31+5:302018-08-30T20:31:23+5:30
सॅलिसबरी पार्क येथील नेहरू रस्त्यावरील गिरीधर भवन चौकातील सुयोग सेंटर समोर रस्त्यावरील खड्डा चुकवताना दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात कुटुंबाने गमावला आधार
बिबवेवाडी : सॅलिसबरी पार्क येथील नेहरू रस्त्यावरील गिरीधर भवन चौकातील सुयोग सेंटर समोर रस्त्यावरील खड्डा चुकवताना दुचाकीस्वार ( एमएच-१२ जे.पी.४९४५) संदिप वसंतलाल शहा ( वय ४८, रा. गंगाधाम सोसायटी) हे पडल्यामुळे त्यांच्या मागून येणारा भरधाव ट्रक (एमएच-११ एएल. ३९०८) डोक्यावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक संजय बागल (वय ३१ रा.काळेवाडी ता.आटपाडी) याला महर्षीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरू रस्ता हा टिंबर मार्केट आणि मार्केटयार्डला जोडणारा रस्ता असून येथे जड वाहतुक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यातच सॅलिसबरी पार्क येथील नेहरू रस्त्यावर खड्डे पडलेले असून सेव्हन लव्ह चौक ते वखार महामंडळाच्या चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सध्या जोरात सुरू आहे. सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे व रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागतात. याच कसरतीचा बुधवारी रात्री एका व्यक्तीचा बळी गेला. मागील वर्षीच याच चौकात एका नागरिकाचा एसटी बसच्या खाली येऊन मृत्यू झाला होता. त्यामुळे असलेल्या रस्त्यांची डागडुजी न करता नवीन कामांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून खड्ड्यामुळे नागरिकांचे आणखी किती बळी जाण्याची वाट प्रशासन पाहणार आहे ? असा संतप्त सवाल नागरिक करत आहे.
................
घरातील कर्ता पुरूष गेला
संदिप शहा यांचे रविवार पेठेत दुकान असून त्यांचा ताडपत्री व दोऱ्यांचा मोठा व्यवसाय आहे. त्यांचे मोठे बंधू व ते हा व्यवसाय एकत्र करत होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी व दोन मुली असून त्यातील एका मुलीचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे व दुसऱ्या मुलीने १२ वीची परीक्षा दिलेली आहे, तसेच घरात वृद्ध आई आहे.