बनावट सैन्य भरती रॅकेटचा भांडाफोड, लष्कर कर्मचारी अन् एजंटांना अटक
By महेश गलांडे | Updated: November 1, 2020 17:43 IST2020-11-01T17:35:12+5:302020-11-01T17:43:11+5:30
लष्करात सैन्यभरती फेब्रुवारीमध्ये शारीरिक क्षमतेची परीक्षा घेण्यात आली होती. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा आज रविवारी वानवडी येथील एआयपीटीच्या मैदानावर घेण्यात आली.

बनावट सैन्य भरती रॅकेटचा भांडाफोड, लष्कर कर्मचारी अन् एजंटांना अटक
पुणे : लष्कर गुप्तचर आणि पुणे शहर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत लष्कर भरतीतील रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे लष्करात भरती करुन देण्याच्या आमिषाने अनेकांना फसविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी राजस्थानमधील अजमेर येथील एक रहिवासी, त्याचे सहकारी, सैन्यात कार्यरत असणारे एक सैन्य कर्मचारी यांना गुन्हे शाखेने पकडले आहे. त्यांच्या ताब्यातून १३ मुळ शाळेची कागदपत्रे, प्रवेश पत्रे, प्रवेशपत्रे जप्त केली आहे. या प्रत्येकाला ३ ते ४ लाख रुपये घेऊन त्यांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.
लष्करात सैन्यभरती फेब्रुवारीमध्ये शारीरिक क्षमतेची परिक्षा घेण्यात आली होती. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा आज रविवारी वानवडी येथील एआयपीटीच्या मैदानावर घेण्यात आली. यावेळी वानसिंग व त्याचा एजंट सहकारी आणि लष्करातील एक लिपिकाला पकडण्यात आले. परिक्षेला आलेल्या दोन बॅचमधील ३० उमेदवारांना लष्कर भरतीचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून ३ ते ४ लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून बनावट भरती रॅकेटमधील इतर संबंधित सदस्यांची चौकशी करण्यात येत आहे.