देवेंद्र फडणवीसांनी आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 17:35 IST2019-12-28T14:23:46+5:302019-12-28T17:35:12+5:30
सीएए आणि एनआरसीवरून सुरु झालेले राजकीय वाकयुद्ध संपण्याचे चिन्ह दिसत नाहीये. त्यातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे नेते आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये असा सल्ला दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये
पुणे : सीएए आणि एनआरसीवरून सुरु झालेले राजकीय वाकयुद्ध संपण्याचे चिन्ह दिसत नाहीये. त्यातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे नेते आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये असा सल्ला दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फडणवीस यांनी शुक्रवारी सीएए आणि एनआरसीवरून बोलताना जर हा कायदा महाराष्ट्र सरकारने स्वीकारला नाही तर 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का' असे विचारण्याची वेळ येईल असे म्हटले होते. त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून पाटील यांनी तर फडणवीसांना सल्ला दिला आहे.
याबाबत ते म्हणाले की, 'त्यांना माझा विनंती वजा सल्ला आहे की त्यांनी फार आक्रस्ताळेपणाची भूमिका घेऊ नये. सरकार नुकतेच गेले असताना माजी मुख्यमंत्र्यांनी तरी लगेच अशी भूमिका घेऊ नये. जरा काळ जाऊ दे, मग भूमिका घ्यावी असेही सांगायला ते विसरले नाहीत.
यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांची खाती ऍक्सिस बँकेतून इतरत्र वळवण्याच्या निर्णयवरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, ' असा कोणताही निर्णय आमच्या सरकारने घेतला नसून मागच्या सरकारचे कोणतेही निर्णय आम्ही विनाकारण फिरवणार नाही'.आगामी शपथविधीवर त्यांनी संवाद भूमिका मांडताना शरद पवार घेतील तो निर्णय मान्य असल्याचे सांगितले.