पार्सलमध्ये अवैध वस्तू असल्याचे सांगून साडेपाच लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: March 27, 2024 17:12 IST2024-03-27T17:12:10+5:302024-03-27T17:12:40+5:30
कारवाईची भीती दाखवून तक्रारदारांच्या बँकेतील रक्कम हडपली

पार्सलमध्ये अवैध वस्तू असल्याचे सांगून साडेपाच लाखांचा गंडा
पुणे : तुमच्या नावाने परदेशात पाठवलेल्या कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून पोलिसी कारवाईची भिती दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मंगळवारी (दि. २६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हडपसर येथील राहुल गुलाटी (३८) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार हा प्रकार २६ नोव्हेंबर २०२३ रोजी घडला आहे. तक्रारदार यांच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी फोन केला. तुमच्या नावाने मुंबई ते तैवान एक पार्सल पाठविण्यात आले आहे. ते पार्सल कस्टम विभागाकडे अडकले असून त्यात अवैध अमली पदार्थ सापडले आहे. तसेच तुमच्या नावाचा गैरवापर केला जात असून त्यासाठी तुमचे आधारकार्ड व बँक खात्याचा वापर करून मनी लॉन्डरिंग करण्यात आली आहे असे सांगून एक लिंक पाठवत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनतर पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल असे सांगून अटकेची भीती दाखवली. तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे सांगत तक्रारदार यांना ५ लाख ५१ हजार रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तक्रारदार यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गीते करीत आहेत.