पुण्यातील माजी नगरसेवक बाबा मिसाळांना धमकी देऊन खंडणी उकळणारा सराईत जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 13:14 IST2022-10-01T13:14:06+5:302022-10-01T13:14:29+5:30
आरोपी इम्रान शेख विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्यास अटक झाली आहे...

पुण्यातील माजी नगरसेवक बाबा मिसाळांना धमकी देऊन खंडणी उकळणारा सराईत जेरबंद
धनकवडी (पुणे) : माजी नगरसेवक बाबा ऊर्फ दिपक धोंडीबा मिसाळांना फोन करून तसेच मेसेज पाठवून गुगल पे द्वारे पैशाची मागणी केली. त्यानंतर पैसे न दिल्यास फिर्यादी दिपक मिसाळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिले होती. याबाबत फिर्यादी दिपक मिसाळ यांनी दिलेल्या तक्रारी वरुन बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर करीत असताना दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपी याने फिर्यादी यांना खंडणी मागण्यांसाठी व धमकावण्यासाठी वापरलेले मोबाईल क्रमांकांची माहिती घेऊन त्याचे तांत्रिक विश्लेषण करता सदरचे क्रमांकांपैकी एक मोबाईल क्रमांक वापरणारा अनोळखी इसम हा इम्रान समीर शेख, (रा. ७९, विकासनगर, घोरपडी गाव) हा असलेचे निष्पन्न झाले.
त्याचा तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे यांनी तपास पथकातील कर्मचाऱ्यांसह शोध घेतला असता तो राहते घर सोडून गेला असल्याची माहिती मिळाली. तक्रारीतील प्राप्त मोबाईल क्रमांकाचे सखोल तांत्रिक विश्लेषन करता आरोपी हा कामारेड्डी, तेलंगणा राज्य येथे असलेची माहिती मिळाली.
माहिती मिळताच वरीष्ठांच्या सुचनेनुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे व पोलीस हवालदार शाम लोहोमकर, पोलीस अंमलदार सतीश मोरे, तानाजी सागर यांनी तात्काळ तेलंगणा राज्यातील कामारेड्डी येथून ताब्यात घेतले. अधिक तपासात त्याने गुन्हा कबूल करताच दाखल गुन्ह्याचे कामी अटक करुन न्यायालयामध्ये हजर ठेवले असता मा. न्यायालयाने त्याची दि. ०३/१०/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडीची रिमांड मंजूर केली असून आरोपीने गुन्ह्याचे कामी वापरलेले मोबाईल फोन व सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.
आरोपी इम्रान शेख विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्यास अटक झाली आहे. सध्या तो जामीनावर आहे. तो जामीनावर असताना त्याचे विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ प्रमाणे गुन्हे दाखल असून त्यामध्ये तो फरार आहे.