RTE अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ, शिक्षण विभागाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 19:37 IST2024-04-30T19:36:22+5:302024-04-30T19:37:32+5:30
यंदा राज्यात ७६ हजार ५३ शाळांनी आरटीई पाेर्टलवर नाेंदणी केली आहे...

RTE अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ, शिक्षण विभागाचा निर्णय
पुणे : आरटीई अंतर्गत शाळांमध्ये रिक्त असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. ३० एप्रिल पर्यंत मुदत दिली हाेती. मात्र, जास्तीत जास्त पालकांना अर्ज करता यावेत तसेच अर्ज निश्चितीसाठी वेळ मिळावा यासाठी शिक्षण विभागाकडून अर्ज करण्याची मुदत येत्या १० मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.
आरटीई कायद्यांतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता २५ टक्के रिक्त जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आरटीई पाेर्टलवर दि. १६ एप्रिल राेजी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यास सुरूवात झाली आणि सुरूवातीस दि. ३० एप्रिल पर्यंत मुदत दिली हाेती. मंगळवारी दि. ३० एप्रिल राेजी सायंकाळी सात वाजेपर्यंत ६१ हजार ४४५ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले हाेते. यंदा राज्यात ७६ हजार ५३ शाळांनी आरटीई पाेर्टलवर नाेंदणी केली आहे. या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत ८ लाख ८६ हजार ४११ जागा रीक्त आहेत.