‘एचएसआरपी’साठी मुदतवाढ; पण वाहन खरेदी-विक्रीला ‘ब्रेक’; परिवहन आयुक्तांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:25 IST2025-06-28T16:24:11+5:302025-06-28T16:25:21+5:30

न्यायालयाच्या आदेशानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाटी लावण्याचे बंधनकारक केले आहे. पुण्यात २६ लाख वाहनांना सुरक्षा नंबर पाटी बसवावी लागणार आहे.

Extension of deadline for 'HSRP'; but 'break' on vehicle purchase and sale; Transport Commissioner's order | ‘एचएसआरपी’साठी मुदतवाढ; पण वाहन खरेदी-विक्रीला ‘ब्रेक’; परिवहन आयुक्तांचा आदेश

‘एचएसआरपी’साठी मुदतवाढ; पण वाहन खरेदी-विक्रीला ‘ब्रेक’; परिवहन आयुक्तांचा आदेश

पुणे : राज्यातील एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाटी (एचएसआरपी) लावण्यात येत आहे; परंतु वाहनधारकांकडून प्रतिसाद कमी असल्याने १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, उच्च सुरक्षा नंबर पाटी न लावलेल्या कोणत्याही जुन्या वाहनांची नूतनीकरणाशिवाय कोणतीही कामे करू नका, असे आदेश परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना (आरटीओ) दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर पाटी लावण्याचे बंधनकारक केले आहे. पुण्यात २६ लाख वाहनांना सुरक्षा नंबर पाटी बसवावी लागणार आहे. आतापर्यंत ६ लाख वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट लावण्यात आली आहे.

सर्व वाहनांना नंबरप्लेट लावण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, जुन्या वाहनांना सुरक्षा नंबर पाटी न बसवल्यास आरटीओत वाहनांसंदर्भात काही कामे करताना नागरिकांना अडचणी येणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने उच्च सुरक्षा नंबर पाटीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

या आहेत आरटीओंना सूचना :

- उच्च सुरक्षा नंबर पाटी न लावलेल्या वाहनांना वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (आरसी) पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढवणे व उतरवणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे ही कामे करू नका.

- ज्या नागरिकांनी सुरक्षा नंबर पाटीसाठी नोंदणी केली आहे, त्यांची अडवणूक करू नये. त्यांची खातरजमा करून कामे वेळेत करून द्यावीत.

Web Title: Extension of deadline for 'HSRP'; but 'break' on vehicle purchase and sale; Transport Commissioner's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.