'कलाग्राम' मध्ये बेवड्यांचे प्रयोग;बंद गेटवर सुरक्षा रक्षक; आत मद्यपींच्या ओल्या पार्ट्या, जागोजागी दारू अन् बिअरच्या बाटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:51 IST2025-02-05T12:49:23+5:302025-02-05T12:51:24+5:30

उद्घाटन होऊन साडेतीन महिने लोटले, तरी प्रकल्प सुरू नाही

Experiments by the bad guys in Kalagram Security guards at the closed gate But wet parties inside | 'कलाग्राम' मध्ये बेवड्यांचे प्रयोग;बंद गेटवर सुरक्षा रक्षक; आत मद्यपींच्या ओल्या पार्ट्या, जागोजागी दारू अन् बिअरच्या बाटल्या

'कलाग्राम' मध्ये बेवड्यांचे प्रयोग;बंद गेटवर सुरक्षा रक्षक; आत मद्यपींच्या ओल्या पार्ट्या, जागोजागी दारू अन् बिअरच्या बाटल्या

हिरा सरवदे

पुणे :
महापालिकेने तब्बल २२ कोटी रुपये खर्च करून पु. लं. देशपांडे उद्यानात साकारलेला ‘कलाग्राम’ प्रकल्प उद्घाटन हाेऊन साडेतीन महिने झाले, तरी अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे येथे पालापाचोळा आणि कचरा पसरला असून, हा कलाग्राम मद्यपींचा अड्डा बनला आहे. जागोजागी दारू, बिअरच्या मोकळ्या बाटल्या आणि सिगारेटची मोकळी पाकिटे पडलेली आहेत. प्रकल्पाच्या बंद असलेल्या गेटवर चोवीस तास सुरक्षा रक्षक असताना, आतमध्ये मात्र ओल्या पार्ट्या चालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सिंहगड रस्त्यावरील पानमळ्याजवळ उद्यान साकारण्याचा ठराव महापालिकेचे २००२ मध्ये मंजूर केला होता. त्यानुसार येथील २७ एकर जागेवर पु. ल. देशपांडे उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानामध्ये जपानी शैलीचे आणि मुघल शैलीचे गार्डन आणि राज्य व देशातील ग्रामीण कलाकृती व लोककला मांडणारे कलाग्राम साकारण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार १० एकर जागेत जपानी शैलीचे गार्डन आणि ६ एकर जागेत मुगल शैलीचे गार्डन, २ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय आणि ३ एकर जागेवर कलाग्राम प्रकल्प साकारण्यात आला. उर्वरित जागा वाहनतळासाठी ठेवण्यात आली.

निधीच्या उपलब्धतेमुळे कासवगतीने काम सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले. तब्बल २२ कोटी रुपये खर्च करून साकारलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीपूर्वी १३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास साडेतीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला. मात्र, अद्याप हा प्रकल्प सुरू झालेला नाही.

प्रकल्पाची सद्य:स्थिती पाहता, महापालिका प्रशासनाने प्रकल्पाच्या बंद असलेल्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात करण्याशिवाय दुसरे काहीच केले नसल्याचे निदर्शनास येते. प्रकल्पाची स्वच्छता व निगा राखण्यात प्रशासन कमी पडल्याचे निदर्शनास येते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच या ठिकाणी तळीरामांकडून दारूच्या ओल्या पार्ट्या केल्या जात आहेत. थंडीच्या दिवसांमुळे शेकोटी करून त्या शेकोटीजवळ दारू पार्ट्या रंगत असल्याचे चित्र पाहायला मिळते. प्रकल्पामध्ये दोन ठिकाणी दारू, बिअरच्या मोकळ्या बाटल्या व सिगारेटची पाकिटे पडलेली आहेत. प्रकल्पाच्या दोन्ही गेटवर चोवीस तास सुरक्षा रक्षकांची नेमणूक असताना आतमध्ये दारूच्या ओल्या पार्ट्या चालतात कशा, या पार्ट्यांमध्ये सुरक्षा रक्षकांचा सहभाग नसतो ना?, अशी शंका उपस्थित होण्यास वाव आहे.

सर्वत्र पालापाचोळा अन् कचऱ्याचे साम्राज्य

कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा कलाग्राम हा एकमेव प्रकल्प असताना, प्रशासनाकडून याची योग्य निगा राखली जात नाही. उद्घाटनावेळी चकाचक दिसणाऱ्या प्रकल्पाची साडेतील महिन्यांतच दुरवस्था झाली आहे. प्रकल्पात सर्वत्र झाडांचा पालापाचोळा व कचरा पडलेला आहे. कचऱ्याच्या बादल्याचे स्टँड वाकले आहेत. शोभेच्या लाइट मोडून पडल्या आहेत. ॲम्पी थिएटरच्या रेलींगवर कपडे सुकण्यासाठी टाकलेले असतात.

जेसीबीवर डान्स...

कलाग्रामच्या परिसराची मंगळवारी सकाळी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पाहणी केली असता, झाडांखाली तरुणांचे ग्रुप बसलेले दिसले. आतमध्ये शाळेतील मुले रिल्स व फोटो काढत हाेते. लहान मुले हातामध्ये पाण्याचा पाइप घेऊन एका जेसीबीवर चढून आंघोळ करण्यासोबतच डान्स करत जेसीबी धुण्यात गुंतलेले दिसले. त्यांना एक तरुण मार्गदर्शन करत होता. आतमध्ये हे चित्र असताना, सुरक्षा रक्षक मात्र बंद गेटवरील केबिनमध्ये झोप काढत होते. येथील एकंदरीत चित्र कोणाचाही कोणावर धाक नाही, आवो जावो घर तुम्हारा असल्याचेच चित्र दिसले.

असे आहे कलाग्राम ...

- कलाग्रामचा परिसर आणि बांधकाम एखाद्या गावातील वास्तूप्रमाणे आहे.

- या ठिकाणी ३० गाळे

- एक ओपन ॲम्पी थिएटर

- विविध राज्यांच्या वस्तूंच्या विक्रींचे काऊंटर

- दोन लायब्ररी

- विविध राज्यांमधील खाद्यपदार्थ विक्री करणारे १२ स्टॉल

- कार्यशाळांसाठी दोन खुले व्यासपीठ

- बांबू व दगडांपासून तयार होणाऱ्या वस्तू व हस्तकलांची प्रात्यक्षिके पाहण्याची व्यवस्था.

Web Title: Experiments by the bad guys in Kalagram Security guards at the closed gate But wet parties inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.