वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो मार्गाचा विस्तार करा -मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:33 IST2025-02-07T15:28:07+5:302025-02-07T15:33:37+5:30
पुणे महापालिकेने खराडी ते पुणे विमानतळ या मेट्रो विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो मार्गाचा विस्तार करा -मुरलीधर मोहोळ
- अंबादास गवंडी
पुणे :पुणेमेट्रोचा शहरभर विस्तार होत असताना मेट्रोतून जास्तीत जास्त पुणेकरांना प्रवास करता येणारी सेवा असावी. पुण्याच्या सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी भविष्याचा विचार करून वाहतूक नियोजनासंदर्भात केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवे पर्याय सुचविले आहेत. या संदर्भातील बैठक पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डिकर यांच्यासोबत झाली. यावेळी मोहोळ यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-खराडी ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्गिका
पुणे महापालिकेने खराडी ते पुणे विमानतळ या मेट्रो विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. हा मार्ग खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मंजूर मेट्रो मार्गात समाविष्ट करून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ-खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला असा संपूर्ण मार्ग करण्यात यावा.
२) खराडी येथे इंटरचेंज मल्टीमाॅडेल ट्रान्सस्पोर्ट हब विकसित करावे.
खराडी आणि परिसराचा झपाट्याने विकसित होत असून, यासाठी खराडी योग्य पर्याय आहे. खराडी येथे हे हब झाल्यास पुणे विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोच्या सर्व मार्गावरून जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. चांदणी चौक ते वाघोली या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना खराडी येथून थेट विमानतळ गाठता येईल.
-कात्रज ते हिंजवडी मेट्रो मार्गाचाही विचार व्हावा !
पुण्यातील वाहतूककोंडीची गंभीर समस्या होत असताना मेट्रोच्या नव्या मार्गांचाही तातडीने विचार होणे आवश्यक असून, यात कात्रज-चांदणी चौक ते हिंजवडी या मार्गावर मेट्रोचा विचार करावा, असे मंत्री मोहोळ यांनी सूचित केले आहे.
-भुसारी कॉलनी, पीएमपी डेपो ते चांदणी चौक दुमजली उड्डाणपुलाची निर्मिती व्हावी.
- वनाज ते चांदणी चौक या मार्गावर वाहतूककोंडीचा विषय गंभीर असून, वनाज ते चांदणी चौक हा मेट्रो मार्ग साकारताना तो दुमजली स्वरूपात करावा.
पुणे शहराचा सर्वांगीण विकास होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन भविष्याचा विचार करून करणे गरजेचे आहे. मोदी सरकारच्या आणि राज्य सरकारच्या भक्कम पाठिंब्यामुळे पुणे शहरात मेट्रोचे जाळे अधिक प्रमाणात विस्तारत आहे. मेट्रोच्या या विस्ताराचा अधिकाधिक पुणेकरांना फायदा व्हावा आणि शहरातील सर्व महत्त्वाचे भाग मेट्रोने जोडले जावेत. -मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री