खबळजनक! पोलीस ठाण्यातच महिलेने फिनाईल पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 19:06 IST2021-08-25T19:06:14+5:302021-08-25T19:06:25+5:30
पती - पत्नीच्या वादातून महिलेने पोलीस अंमलदाराच्या कक्षेत पिले फिनाईल

खबळजनक! पोलीस ठाण्यातच महिलेने फिनाईल पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न
पुणे : पोलीस आयुक्तालयाच्या आवारात पेटवून घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रकारापाठोपाठ आता पती-पत्नीच्या वादातून महिलेने पोलीस ठाण्यातच फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कोंढवा पोलीस ठाण्यात हे आत्महत्या नाट्य घडले.
याप्रकरणी आफरिन उमर शेख (वय २१, रा. नवाझिस पार्क, कोंढवा) हिच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलीस कर्मचारी येनभाऊ भिलारे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला व तिच्या पतीचे भांडण झाले होते. पती चारित्र्यावर संशय घेत असल्याने पत्नी आणि तिच्या दोन मित्रांनी त्याला बेदम मारहाण केली होती. त्याची तक्रार देण्यासाठी पती मंगळवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता कोंढवा पोलीस ठाण्यात आला होता. ठाणे अंमलदार कक्षात पती बसला असताच त्याच्या मागोमाग पत्नीही तेथे आली. तिने ठाणे अंमलदाराच्या खोलीतच फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृति स्थिर असून, उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.