Pro Kabaddi League 2024: रोमहर्षक सामना! प्रो कबड्डी लीग स्पर्धेत जयपूर पिंक पँथर्स व यु मुंबा यांच्यात बरोबरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 18:09 IST2024-12-06T18:08:34+5:302024-12-06T18:09:31+5:30
बरोबरी झाल्यावर ४ मिनिटे बाकी असताना जयपूर संघावर लोण चढविण्याची मुंबा संघाला संधी होती, मात्र या संधीचा लाभ त्यांना घेता आला नाही

Pro Kabaddi League 2024: रोमहर्षक सामना! प्रो कबड्डी लीग स्पर्धेत जयपूर पिंक पँथर्स व यु मुंबा यांच्यात बरोबरी
पुणे: शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक ठरलेला जयपूर पिंक पँथर्स व यु मुंबा यांच्यातील प्रो कबड्डी स्पर्धेचा सामना २२-२२ असा बरोबरीत सुटला. पूर्वार्धात यु मुंबाकडे १२ विरुद्ध ८ अशी चार गुणांची आघाडी होती.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत जयपूर पिंक पँथर्स व यु मुंबा यांच्यातील सामना ही अतिशय चुरशीने खेळला गेला. सांघिक कौशल्याच्या जोरावर यु मुंबा संघाने मध्यंतराला १२-८ अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. मात्र, उत्तरार्धात जयपूर संघाच्या खेळाडूंनी पकडी व खोलवर चढाया असा खेळ करीत त्यांची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. शेवटची दहा मिनिटे बाकी असताना १५-१५ अशी बरोबरी होती. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना १८-१८ अशी बरोबरी होती. चार मिनिटे बाकी असताना जयपूर संघावर लोण चढविण्याची मुंबा संघाला संधी होती मात्र या संधीचा लाभ त्यांना घेता आला नाही.
जयपूर संघाकडून अंकुश राठी याने पकडीमधील २०० गुणांचा टप्पा ओलांडला. जयपुर संघाकडून रेझा मीर बाघेरी यांनी गुण नोंदवले रोनक सिंग व निरज नरवाल यांनीही त्याला चांगली साथ दिली. यु मुंबा संघाकडून रोहित राघव याने चार गुण तर सोमबीर याने सात गुण नोंदविले.