पुण्यात खळबळ! फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 21:12 IST2022-09-10T19:59:31+5:302022-09-10T21:12:56+5:30
अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी चार दिवसांची कोठडी...

पुण्यात खळबळ! फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक
कोरेगाव भीमा (पुणे) : पुणे पालिकेचे एका माजी नेत्याच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या शेतमजुराच्या मुलाने नातेवाईक मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने येत्या १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्यात. मात्र हा प्रकार फार्म हाऊस घडल्यामुळे प्रकार दाबण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडचे तृप्ती देसाई यांनी केला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेल्या विशाल दामोदर गायकवाड (वय २१, मूळ रा. हळणी, ता. अहमदपूर, जि. लातूर) याची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीतील एका राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवर शेतमजूर म्हणून पीडित मुलीच्या आई-वडिलांसह इतरही काही कुटुंबीय कामास आहेत. पीडित मुलीचे आई-वडील बाहेर गेलेले असताना त्यांच्याच नात्यातील विशाल गायकवाड याने पीडितेला बळजबरीने पकडून घरामागे नेत जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला.
तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगू नको म्हणूनही धमकावले. या प्रकाराने भेदरलेल्या मुलीने याबाबत आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करून विशाल गायकवाड याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारासह बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला तातडीने अटक केली. आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, अधिक तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, पीडित मुलीला तातडीने वैद्यकीय मदत पुरविण्यात आली असून, तपास यंत्रणेवर कोणताही दबाव नसल्याचे सांगत या प्रकरणाशी फार्म हाऊस मालकाचा संबंध नसल्याचेही पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी स्पष्ट केले.