खोदकामे अन् विकासकामे झाडांच्या ‘मुळावर’..;वर्षभरात कोसळली एक हजार झाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 12:07 IST2026-04-05T12:07:30+5:302026-04-05T12:07:49+5:30

- अनेक घटनांमध्ये मोठ्या नुकसानीसह जीवितहानीही

Excavation and development work at the 'roots' of trees..; One thousand trees fell in a year | खोदकामे अन् विकासकामे झाडांच्या ‘मुळावर’..;वर्षभरात कोसळली एक हजार झाडे

खोदकामे अन् विकासकामे झाडांच्या ‘मुळावर’..;वर्षभरात कोसळली एक हजार झाडे

पुणे : विविध प्रकारची विकासकामे आणि वाहिन्यांसाठी केली जाणारी शहरातील खोदाई झाडांच्या मुळावर उठली असल्याचे चित्र आहे. यामुळे वर्षभरात जवळपास एक हजार झाडे कोसळली आहेत. शहरातील झाडपडीच्या घटनांमुळे आणि धोकादायक फांद्या तुटण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीसह काही घटनांमध्ये नागरिकांचे जीवही गेले आहेत. शहरात दोन दिवसांपूर्वीच झालेल्या वादळी पावसात झाड कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे.

पुणे शहराचा नैसर्गिक आकार हा बशीसारखा असून, आसपास मोठ्या प्रमाणात डोंगर आणि टेकड्या आहेत. या डोंगरांवर व टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात वनराई आहे. शिवाय शहरातील विविध रस्ते, सार्वजनिक जागांवरही मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्या आकाराची झाडे आहेत. त्यामुळे शहराला संपन्न असा पर्यावरणाचा वारसा लाभलेला आहे. या वारशामुळे देशभरातील नागरिक पुणे शहरात राहण्यास प्राधान्य देतात. हाच वारसा जतन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रेमी काम करतात. महापालिकेच्या नोंदीनुसार शहराची जेवढी लोकसंख्या आहे, तेवढीच झाडांची संख्या आहे.

मात्र, महापालिका व खासगी स्वरुपाच्या विविध विकासकामांसाठी आणि विविध सेवावाहिन्या टाकण्यासाठी केल्या जाणाऱ्या खोदाईमुळे झाडांच्या मुळांचे नुकसान होते. त्यामुळे खोदाईनंतर दोन-तीन वर्षे उभे दिसणारे झाड लहान-मोठ्या पावसात वाऱ्यामुळे कोसळते. परिणामी वाहने, इमारती आणि मनुष्य हानी होते. अग्निशामक दलाकडील माहितीनुसार २०१४ ते २०२५ या कालावधीत शहरात १२ हजार १५१ झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये २०२४ वर्षात सर्वाधिक १६८२ झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तसेच शहर व परिसरात बुधवारी झालेल्या पावसामुळे १०५ तर गुरुवारी झालेल्या पावसामुळे ८५ झाडपडीच्या घटना घडल्या. यामध्ये सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिराजवळील झाड कोसळल्याने एका फुलविक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला.

अशी नष्ट केली जातात झाडे

झाडाच्या मुळाशी कचरा जाळण्याचे वा आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. जेणेकरून झाडाची मुळे जळून झाडातील सजीवपणा नष्ट होतो आणि ते आपोआप वाळते. मग वाळलेले झाड पाडताना कायद्याच्या अडचणीही येत नाहीत. अनेक वेळा बांधकाम व्यावसायिक अडचण ठरणाऱ्या झाडांच्या बुंध्यांना जाळतात किंवा झाडाच्या मुळाशी विषारी रसायने टाकून ती निर्जीव केली जातात. या संदर्भात पर्यावरणप्रेमींनी पालिकेच्या उद्यान विभागातही तक्रारी केल्या आहेत.


झाडांसाठी काँक्रिटीकरण ठरतेय मारक

रस्त्यांवर झाडांच्या कडेने काही प्रमाणात तरी मोकळी जमीन सोडणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात झाडाला अगदी खेटूनच डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण केले जाते. परिणामी, झाडे कमकुवत होतात. रस्ते रुंद करताना किंवा पदपथ करताना अनेक झाडांची मुळे तोडली जातात. खोडाच्या आसपास माती राखली जात नाही.  

झाडे कोसळण्याची कारणे

- मुसळधार पावसामुळे माती सैल होऊन मुळे कमजोर होतात.

- जोराचे वारे व वादळ

- जुनी व पोकळ झाडे

- बांधकामे व खोदाई

- रस्ते रुंदीकरण

- कीड व रोग

- पाणी साठणे

- वीजवाहिन्या व केबल अडकणे
 

उपाययोजना

- झाडांची नियमित छाटणी करणे

- झाडांचे सर्वेक्षण करून धोकादायक झाडे ओळखणे.

- बांधकामावेळी झाडांना संरक्षण देणे.

- कमकुवत झाडांना आधार देणे.

- कीड नियंत्रणासाठी प्रयत्न करणे.

- धोकादायक झाडे काढून टाकणे.

शहरातील झाडपडीच्या घटना

- २०१४ - ६८०

- २०१५ - ८२१
- २०१६ - ८१८

- २०१७ - १२०१
- २०१८ - ९३६

- २०१९ - १२६९
- २०२० -११५२

- २०२१ - ६९५

- २०२२ - ९७९
- २०२३ - ९३३

- २०२४ - १६८२
- २०२५ - ९८५.
 


महापालिकेकडून दरवर्षी शहरातील झाडांची गणना केली जाते. यामध्ये धोकादायक आढळणारी झाडे महापालिकेकडून काढली जातात. खासगी जागेत धोकादायक झाड असेल किंवा त्याच्या फांद्या धोकादायक असतील तर त्या काढण्यासाठी नागरिकांनी महापालिकेकडून परवानगी घ्यावी, असे आवाहन केले जाते. अनेक वेळा धोकादायक झाडे किंवा फांद्या कापताना पर्यावरणप्रेमींचा विरोध होतो. मात्र, तेच झाड किंवा फांदी कोसळून अपघात झाला तर महापालिकेला जबाबदार धरले जाते. अनेक वेळा खोदाईमुळे झाडांची मुळे तुटतात. असे झाड वरून जरी सुस्थितीमध्ये दिसत असले तरी ते कालांतराने ते कोसळते.  - अशोक घोरपडे, उद्यान विभागप्रमुख, महापालिका


पाऊस आणि वाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे झाडेच काय तर होर्डिंगही कोसळत आहेत. या घटना टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील झाडांचे सर्वेक्षण करून धोकादायक झाडे कोणती आहेत, हे निश्चित करणे गरजेचे आहे. या झाडांचा अभ्यास करून योग्य शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या झाडाची छाटणी करून त्याचे वजन कमी करणे गरजेचे आहे. मात्र, महापालिका मनुष्यबळाची कमी असल्याने झाडांच्या छाटणीसाठी व फांद्या तोडण्यासाठी ठेकेदार नेमतात. ठेकेदारांच्या लोकांचा अभ्यास नसतो, ते अभ्यास न करता छाटणी व फांद्या तोडतात. केवळ परदेशी झाडेच पडतात, हे म्हणणे चुकीचे आहे. देशी झाडेही पडतात. - श्रीकांत इंगळहळ्ळीकर, ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ

Web Title : पुणे का विकास: पेड़ों की जड़ें खतरे में, हर साल हजारों पेड़ गिर रहे हैं

Web Summary : पुणे में विकास कार्य और खुदाई से पेड़ों की जड़ें कमजोर हो रही हैं, जिससे पेड़ गिरने की घटनाएं बढ़ रही हैं। हाल ही में एक महिला की जान चली गई। विशेषज्ञों ने पेड़ों का सर्वेक्षण, उचित छंटाई और निर्माण के दौरान सुरक्षा पर जोर दिया है ताकि शहर की हरियाली बनी रहे।

Web Title : Pune's Development: Tree Roots Suffer, Thousands of Trees Fall Annually

Web Summary : Pune's rapid development and digging for utilities are damaging tree roots, causing numerous tree falls. A recent incident resulted in a woman's death. Experts emphasize the need for tree surveys, proper pruning, and protection during construction to prevent further incidents and preserve the city's green cover.