माजी आमदार पुत्राचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्याला जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 12:50 IST2024-12-07T12:50:02+5:302024-12-07T12:50:02+5:30
आराेपीने जामिनासाठी ॲड.गणेश पी. माने यांच्यामार्फत अर्ज केला हाेता. आरोपीविरोधात कोणताही सबळ पुरावा दाखल नसून केवळ संशयाच्या आधारावर गुन्ह्यामध्ये गोवले आहे.

माजी आमदार पुत्राचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्याला जामीन
पुणे : शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करत, जीवे मारण्याची धमकी देऊन दहा कोटींची खंडणी मागण्यात आली हाेती. या प्रकरणातील आरोपी तुषार संजय कुंभार यास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
आराेपीने जामिनासाठी ॲड.गणेश पी. माने यांच्यामार्फत अर्ज केला हाेता. आरोपीविरोधात कोणताही सबळ पुरावा दाखल नसून केवळ संशयाच्या आधारावर गुन्ह्यामध्ये गोवले आहे. त्यामुळे गुन्ह्यात लावलेले खंडणीचे कलम कुंभार यास लागू होत नाही. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाला असून, आरोपीच्या कोठडीची गरज नाही.
यासह इतर अनेक न्यायिक मुद्द्यांवर ॲड.माने यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत, ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला. ॲड.माने यांना ॲड.धनंजय गलांडे व ॲड.उमेश मांजरे यांनी सहकार्य केले.